Coronavirus updates: मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, रेल्वे, बस, बँका सोडून ‘ही’ ४ शहरं ३१ मार्चपर्यंत बंद

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जीवनावश्यक सेवा तसंच रेल्वे, बस आणि बँका सोडून मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासोबत फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गर्दी कमी करण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना जाहीर केल्या. 

हेही वाचा- Coronavirus Updates: चिंता नको! कोरोनाबाधीतांचा सगळा खर्च सरकार उचलणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

नाईलाजाने निर्णय

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, मी केलेल्या आवाहनानुसार गर्दीत बराच फरक पडला आहे.  जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य दुकानं बंद करण्याचं आवाहन मी केलं होतं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परंतु काही ठिकाणी अजूनही ऑफिस सुरू आहेत. त्यामुळे गर्दी पूर्णपणे कमी झालेली नाही. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पुढचे १५ दिवस काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे नाईलाजानं सरकारला काही गोष्टी कराव्या लागत आहेत.

त्यानुसार मुंबई महानगर परिसरात, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरमध्ये जिथं प्रामुख्याने परदेशातून अनेक प्रवासी दाखल होत आहेत. अशा ठिकाणी जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बंदी ३१ मार्च पर्यंत असणार असून आज मध्यरात्रीपासून हे आदेश लागू होणार आहेत. आजपर्यंत जे सहकार्य मिळालं तसंच यापुढेही राहील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

रेल्वे, बसचा मोठा परिणाम 

ते पुढं म्हणाले की काहीजण मला म्हणाले की रेल्वे, बस बंद करा. पण खासकरून मुंबईच्या बाबतीत सांगायचं झाल्यास रेल्वे आणि बस शहराच्या वाहिन्या आहेत. ते बंद करणं सोपं आहे. पण त्या बंद झाल्या तर त्याचा अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होऊ शकतो. डाॅक्टर-नर्ससारखे आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पाणी पुरवठा करणारे महापालिका कामगार, अॅम्ब्युलन्स, बसची सेवा देणारे ड्रायव्हर इ. कर्मचारी हे याच वाहनांनी येत असतात. त्यामुळे या सेवा बंद झाल्या तर त्याचा संपूर्ण व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तूर्तात या दोन सेवा बंद होणार नाहीत.

हेही वाचा- Coronavirus Updates: कोरोनाबाधीतांना आता 'असं' ट्रॅक करणार, जीपीएसवरून ठेवणार लक्ष

माणुसकीच्या नात्याने पगार द्या

सरकारी कार्यालयात आतार्यंत ५० टक्के उपस्थिती करण्यात आली होती, ती कमी करून २५ टक्के हजेरी असेल. ज्यांना शक्य असेल त्या खासगी कंपन्यांमध्ये वर्क फ्राॅम होम आणि ज्यांना शक्य नसेल, अशा कंपन्या नाईलाजाने बंद ठेवाव्या लागतील. यामुळे गर्दी टाळण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे. पण असं करताना खासगी कंपन्यांच्या मालकांनी, उच्च वर्गातील लोकांनी हातावर पोट चालणाऱ्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून किमान वेतन द्यावं, अशी विनंती. 

मात्र सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ही फिरण्याची सुट्टी नाही. त्यामुळे कुणी घराबाहेर पडून नका. एवढं करूनही जर गर्दी कमी न झाल्याचं आम्हाला वाटलं नाही, तर नाईलाजानं रेल्वे बससेवा बंद करावी लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या