राणेंच्या पक्षाचं होणार भाजपात विलिनीकरण!

लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये महाभरती सुरू झाली आहे. स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचं जाहीर केलं आहे. यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातेवाईक आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील, कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक, सोलापुरातील काँग्रेसचे आमदार आणि एक विद्यमान खासदार भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत.

भाजपमध्ये विलीन

भाजपच्या सहकार्यानं राज्यसभेवर निवडून गेलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत. एक सप्टेंबरला सोलापुरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत हे विलीनीकरण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याशिवाय, इतर नेत्यांचा पक्षप्रवेशही याचवेळी होणार आहे. 

राणे समर्थकांना उमेदवारी

सिंधुदुर्ध, रत्नागिरी या पट्ट्यात नारायण राणे यांनी भाजपच्या जागा विजयी कराव्यात आणि ते करत असताना राणे समर्थकांना उमेदवारी द्यावी याविषयी भाजपचं मन वळवलं आहे. नारायण राणे यांनी नितेश राणे यांच्यासाठी उमेदवारी मागितल्याचं समजतं. तसंच, सिंधुदुर्गात आपल्याला३ जागा मिळाव्यात असा आग्रह धरल्याची माहिती समोर येत आहे. 

१ सप्टेंबरला पक्षप्रवेश

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगजितसिंह पाटील यांच्याबरोबरच कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सोलापुरातील काँग्रेसचे आमदार व एक विद्यमान खासदारही १ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसंच, राष्ट्रवादीचेच आणखी एक नेते भास्कर जाधव आणि आमदार अवधूत तटकरे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत.


हेही वाचा -

पनवेलहून थेट गोरेगाव लोकल, हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

शुक्रवारी होणार दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर


पुढील बातमी
इतर बातम्या