नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

राष्ट्रपती भवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी संध्याकाळी भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. 

'मोदी सरकार-२'च्या शपथविधी सोहळ्यात मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पाठोपाठ महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, कर्नाटकातील भाजपाचे वरिष्ठ नेते सदानंद गौडा, माजी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण, लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान, नरेंद्रसिंह तोमर, रविशंकर प्रसाद, अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल, डाॅ. थावरचंद गहलोत, माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक, झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी, डॉ. हर्षवर्धन, महाराष्ट्रातील भाजपचे नेते प्रकाश जावडेकर, मुंबईतील भाजपचे नेते आणि माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल, ओडिशातील भाजपचे नेते आणि माजी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नकवी, कर्नाटकातील भाजपचे नेते प्रल्हाद जोशी, उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे, मुंबईतील शिवसेनेचे खासदार डॉ. अरविंद सावंत, गिरीराज सिंह, गजेंद्रसिंह शेखावत, संतोषकुमार गंगवार इ. २५ खासदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

तर, राव इंद्रजीत सिंह, श्रीपाद नाईक, जितेंद्र सिंह, किरण रिजिजू, प्रल्हाद पटेल, आर. के. सिंह, हरदीपसिंह पुरी, मनसुख मांडविया, फग्गनसिंह कुलस्ते, अश्विनीकुमार चौबे, अर्जुनराम मेघवाल, माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह, कृष्णपाल गुर्जर, महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जी. कृष्ण रेड्डी, पुरुषोत्तम रुपाला, रिपाई आठवले गटाचे रामदास आठवले, साध्वी निरंजन ज्योती, बाबूल सुप्रियो, डॉ. संजीव बलियान, महाराष्ट्रातील संजय धोत्रे, अनुराग ठाकूर, सुरेश अंगडी, नित्यानंद राय, रतनलाल कटारिया, व्ही. मुरलीधरन, रेणुका सरुता, सोम प्रकाश, रामेश्वर तेली, प्रताप सारंगी, कैलाश चाैधरी, देबश्राी चौधरी, यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

राष्ट्रपती भवनात संध्याकाळी ७ वाजल्यापासून  हा सोहळा रंगला. या सोहळ्याला तब्बल ६ हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यापासून सर्व राज्यातील महत्त्वाचे नेते, मुख्यमंत्री शपथविधासाठी उपस्थित राहिले.

या शपथविधीसाठी पाकिस्तान वगळून बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान या देशांचा समावेश असलेल्या ‘बिमस्टेक’ देशांचे प्रमुख देखील उपस्थित होते.

सुपरस्टार रजनीकांत, अभिनेते कमल हासन यांच्यासह कंगना रणौत, शाहरूख खान, करण जोहर, संजय लीला भन्साळी इ. बॉलिवूडच्या तारे-तारकांनीही सोहळ्याला हजेरी लावली.   


हेही वाचा- 

राष्ट्रवादी होणार काँग्रेसमध्ये विलीन, ही तर अफवा- शरद पवार

शिवसेनेला हवं रेल्वे मंत्रालय?, राज्यातील 'या' खासदारांना मिळणार मंत्रीपद


पुढील बातमी
इतर बातम्या