जनताच मोदींना पर्याय देईल- पवार

जनता शहाणी असून तीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय देईल तसंच ज्या पक्षाचे जास्त खासदार असतील त्याच पक्षाचा पंतप्रधान होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत पवार यांनी २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात नेत्यांना मार्गदर्शन केलं.

काय म्हणाले पवार?

पुढच्या वर्षी २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असणार नाही. तर ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार असतील, त्याच पक्षाचा पंतप्रधान होईल. या बदलास सगळ्यांनी तयार असलं पाहिजे. अशीच भूमिका असणाऱ्या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल. या आधी राहुल गांधी यांनी काँग्रेसला जागा मिळाल्या, तर मीच पंतप्रधान होणार, असं वक्तव्य केलं होतं. जनता शहाणी आहे, तीच मोदींना पर्याय उभा करेल, असं सांगत पवारांनी काँग्रेसचं नेतृत्व मोदींना पर्याय ठरू शकत नाही, असं सूचक वक्तव्य केलं.

संघटनांविरोधात कारवाई करा

विचारवंतांच्या हत्या होणं म्हणजे धर्मनिरपेक्षतेवरचा हल्ला आहे. ज्या संघटना चुकीचं काम करत आहेत, त्या संघटनांविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. जे भाजपाबरोबर जाणार नाहीत, त्या पक्षांना एकत्र घेण्याचा प्रयत्न करणार. सध्या तामिळनाडूमध्ये 'डीएमके' हा पक्ष पहिल्या क्रमांकाचा आहे.

'डीएमके' भाजपासोबत नसल्याने इतर पक्षांनी त्यांना साथ दिली पाहिजे. इतर राज्यातही पहिल्या क्रमांकाच्या पक्षाला इतर पक्षांनी साथ द्यायला हवी. यासाठी मी सहकार्य करण्यास तयार असून इतरांनीही असा समजूतदारपणा दाखवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


हेही वाचा-

इंटरनेट फुकट देता, मग रेशनही द्या - उद्धव ठाकरे

'सनातन'वर बंदी घालण्याचं काम सुरू- केसरकर


पुढील बातमी
इतर बातम्या