तरच चौकशीला उपस्थित राहणार, अनिल देशमुखांचं निवेदन

अंमलबजावणी संचलनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स तब्बल पाचवेळा बजावून देखील हजर न होणारे राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात ‘लूक आऊट नोटीस’ जारी होणार असं म्हटलं जात आहे. त्यातच अनिल देशमुख यांनी एक निवेदन प्रसिद्धीसाठी दिलं आहे. त्यात त्यांनी ईडीसमोर हजर होण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

यामध्ये अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, माझी ईडीच्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः ईडीच्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे.

हेही वाचा- सरकार धार्मिक स्थळे उघडत नाही, पण दारूची दुकानं उघडत; राम कदमांची सरकारवर टीका

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीच्या कारवाईविरोधात संरक्षण मिळावं, याची मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयानं ही याचिका फेटाळली. सोबतच या प्रकरणी फौजदारी खटल्याच्या अन्य न्यायालयात दाद मागता येईल, असं सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे. 

पाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावलं होतं. त्यानंतर अनिल देशमुखांचे वकील वकिल इंदरपाल सिंग यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन अनिल देशमुख यांना ईडीसमोर हजर राहता येणार नसल्याचा अर्ज दाखल केला. अन्य न्यायालयात या प्रकरणी दाद मागितल्यावर व तेथील निकालानंतरच चौकशीला उपस्थित राहू, असं अनिल देशमुख यांच्यातर्फे ईडीला कळवण्यात आलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या