पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ८ वाजता देशाला संबोधित केलं होतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रीपासून २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र जनतेला जास्त संभ्रमावस्थेत ठेवले असल्याने जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भाव लक्षात घेता देशातील लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे, सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता, अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
जीवनावश्यक गोष्टींच्या बाबत पंतप्रधानांच्या घोषणेमध्ये स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. देश एका संकटाला तोंड देत असताना देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अपुरी माहिती दिल्याने, देशात अनागोंदी निर्माण झाली आहे. परंतु, महाराष्ट्रातील जनतेनं घाबरून जाण्याचं कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात गेले दोन दिवस लॉकडाऊन सुरूच आहे. पुढील काळातही जनतेच्या सर्व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. हे सरकार जनतेला जीवनावश्यक सुविधांच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी कटिबद्ध आहे, असं आश्वासनही जयंत पाटील यांनी दिलं आहे.
हेही वाचा