Advertisement

सोशल डिस्टन्सिंगची ताकद काय? सुप्रिया सुळेंनी शेअर केलेला व्हिडिओ बघाच..

जनतेला सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व पटवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सोशल डिस्टन्सिंगची ताकद काय? सुप्रिया सुळेंनी शेअर केलेला व्हिडिओ बघाच..
SHARES

कोरोना व्हायरसने (coronavirus) बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना अद्याप यावर कुठलंही ठोस औषध उपलब्ध होऊ शकलेलं नाही. त्यामुळे या आजारापासून वाचायचं असल्यास सध्या तरी सोशल डिस्टन्सिंग अर्थात समाजापासून अलिप्त होणं, इतरांमध्ये न मिसळणं हाच एकमेव उपाय आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील याला दुजोरा दिला आहे. परंतु भारतातील जनता अजूनही याबाबत गंभीर झालेली दिसून येत नाहीय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Ncp mp supriya sule) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केलेला व्हिडिओ नक्की बघावा.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित (covid-19) रुग्णांची संख्या ११९ वर जाऊन पोहोचली आहे. यातील ३ जणांचा मृत्यू झाला असून इतरांवर उपचार सुरू आहेत. यातील ४८ जण मुंबईतील आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासहित तमाम नेते मंडळी आणि प्रशासकीय  

यंत्रणा जनतेला घरात बसण्याची सूचना करत आहेत. सक्तीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता देशभरात संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. असं असूनही लोकं या ना त्या कारणांनी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे नाईलाजाने आता पोलिसांनाही आपले दंडुके उगारण्याची वेळ आली आहे. 

अशा स्थितीत जनतेला सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व पटवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण कळत न कळत किती झपाट्याने या आजाराचा फैलाव करतो, हे दाखवण्यात आलं आहे.

एक करोनाबाधित व्यक्ती ५ दिवसांमध्ये २.५ लोकांपर्यंत हा व्हायरस पोहोचवते. याप्रमाणे ही व्यक्ती ३० दिवसांत ४०६ लोकांमध्ये हा आजार पसरवते. जर या कोरोनाबाधित व्यक्तीने सोशल डिस्टंसिंग करुन लोकांशी ५० टक्क्यांनी संपर्क कमी केला. तर या व्यक्तीकडून ५ दिवसांत १.२५ लोकांना कोरोनाचाा संसर्ग होऊ शकतो. तर ३० दिवसांत केवळ १५ लाेकांना या संसर्गाची लागण होऊ शकते. या व्यक्तीने सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून ७५ टक्के लोकांशी संपर्क कमी केला तर ही व्यक्ती ५ दिवसांत ०.६२५ लोकांना संक्रमित करु शकते. तर ३० दिवसांत केवळ २.५ लोकांनाच या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा होण्याचा धोका असेल.

हा व्हिडिओ बघून प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग करायला सुरूवात केली पाहिजे, अशी अपेक्षाही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.  


संबंधित विषय
Advertisement