शहरांची नावं बदलून विकास होत नाही, राष्ट्रवादीची परखड भूमिका

औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडीत फूट पडल्याचा दावा विरोधकांकडून केला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) देखील नामांतराबाबत आपली भूमिका मांडली आहे. शहरांची नावं बदलून विकास होतो, असं आम्ही मानत नाही, असं परखड मतच राष्ट्रवादीने मांडलं आहे. यामुळे नामांतराच्या मुद्द्यावर सहकारी पक्षाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना कितपत साथ मिळेल हा चर्चेचा विषय बनला आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेने (shiv sena) औरंगाबाद जिल्ह्याचं संभाजीनगर असं नामांतर करण्यासाठी जोर लावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील याबाबत सकारात्मक असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र काँग्रेसने (congress) या नामांतराला विरोध केला आहे. नामांतराचा मुद्दा तापलेला असताना आता औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा- राजीनाम्याच्या चर्चांवर बाळासाहेब थोरातांनी सोडलं मौन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मलिक म्हणाले की, औरंगाबादचं नामांतर वा कुठल्याही शहरांची नावं बदलण्याचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावरील विषय नाही. अशा प्रकारचा प्रस्ताव २० वर्षांपूर्वीच आम्ही अमान्य केला होता. नावं बदलून शहरांचा विकास होतो असं आम्ही मानत नाही. त्यामुळे याबाबत वेगळं काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरीही महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही.

तर याआधी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षाने देखील या नामांतराला विरोध केला आहे. शहरांचं नाव बदलून कधीच शहराची, उन्नती, विकास झालेला नाही वा कुणाचं पोटंही भरलेलं नाही. जुन्या शहरांची नावं बदलून काय साध्य होणार आहे? त्याऐवजी नवं शहर वसवून दाखवावं. महाराष्ट्रात भरपूर जमीन आहे, तिथं दोन ते चार नवे जिल्हे बनवा, तुमचं सहजपणे नाव होईल. परंतु औरंगाबाद, अहमदनगर या जुन्या शहरांचा स्वत:चा इतिहास आहे. नाव बदलून या शहराचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नका. नावच बदलायचं असेल, तर महाराष्ट्राचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज असं करा, रायगडचं नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव द्या, जेणेकरून महाराष्ट्रातील जनता खूश होईल, असं मत अबू आझमी यांनी व्यक्त केलं होतं.

(ncp leader nawab malik talks on aurangabad name change issue)

हेही वाचा- तर महाराष्ट्राचं नाव बदलून ‘हे’ ठेवा, ठाकरे सरकारला ‘या’ नेत्याचा सल्ला
पुढील बातमी
इतर बातम्या