नरेंद्र पाटीलही भाजपाच्या गळाला?

लोकसभा-विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसं भाजपानं इनकमिंगकडे विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे भाजपात आल्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. या आमदाराचं नाव आहे नरेंद्र पाटील.

चर्चांना उधाण

निरंजन डावखरे यांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात अधिकृत प्रवेश केला. भाजपा प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी डावखरे यांना कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी चक्क नरेंद्र पाटील आले आणि त्यांना पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

त्यानंतर नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीनं राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपाच्या गळाला लागणार याचीच जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसं झाल्यास हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असेल, असंही म्हटलं जात आहे.

मित्राला साथ

याबाबत नरेंद्र पाटील यांना विचारलं असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मात्र निरंजन आणि आपण खूप चांगले मित्र असून मित्राला साथ देण्यासाठी आल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.

कोण आहेत नरेंद्र पाटील?

नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार नेते असून सद्यस्थितीत ते विधानपरिषदेवर आमदार आहेत. माथाडी कामगार संघटनेचे नेते आणि संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे ते सुपूत्र आहेत.


हेही वाचा-

...तर मी इथं भाजपाच्या प्रचारासाठी आलो असतो- उद्धव ठाकरे


पुढील बातमी
इतर बातम्या