Ram Mandir: अयोध्येचा रस्ताच शिवसेनेने तयार केलाय- संजय राऊत

उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी कुठल्याही निमंत्रणाची गरज नाही. कारण अयोध्येचा रस्ताच शिवसेनेने तयार केला आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलं. येत्या ५ आॅगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं आहे का ? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता, राऊतांनी हे उत्तर दिलं. (no need of invitation for maharashtra cm uddhav thackeray to visit ayodhya ram mandir says shiv sena mp sanjay raut)

यासंदर्भात संजय राऊत पुढं म्हणाले की,अयोध्या आणि शिवसेनेचं जुनं नातं आहे. हे नातं राजकीय नाही. राजकारणासाठी आम्ही कधीच अयोध्येला जात नाही आणि गेलो नाही. अयोध्येचा रस्ताच शिवसेनेने तयार केला आहे. अयोध्येच्या रस्त्यावरील अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत. श्रद्धा आणि हिंदुत्त्व या भावनेतून शिवसैनिकांनी राम मंदिरासाठी बलिदान केलं आणि ते कायम राहील, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा- "राम मंदिर होईल, तेव्हाच कोरोना जाईल.."!

तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही गेले होते आणि मुख्यमंत्री झाल्यावरही गेले. हा कार्यक्रम राम जन्मभूमी न्यास यांच्या माध्यमातून आयोजित केला जात असून त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी किती लोकांना निमंत्रण देण्यात येणार आहे, सोशल डिस्टन्सिंग, राजकीय सोशल डिस्टन्सिंग किती पाळणार आहेत यावर ते अवलंबून आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरासाठी कोन शीला बसवण्याचा कार्यक्रम करण्यात येईल. येत्या ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधान मोदी या कार्यक्रमासाठी अयोध्येला जातील. पंतप्रधान झाल्यापासून मोदी पहिल्यांदाच अयोध्येला जाणार आहेत. भूमिपूजन कार्यक्रमात श्रीराम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास ४० किलो वजनाच्या चांदीची शीला समर्पित करतील. 

दरम्यान, जेव्हा अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, त्याच दिवशी कोरोना जाईल, असं मोदी सरकारला वाटत आहे. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत देखील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा घाट घातला जातोय. सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. परंतु आमच्यासाठी तर कोरोना संकटाशी मुकाबला करणंच महत्त्वाचं आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या प्रस्तावित भूमिपूजन कार्यक्रमावर भाष्य केलं. 

हेही वाचा- Ram Mandir: पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? निलेश राणे यांचा सवाल 

पुढील बातमी
इतर बातम्या