“माझे कुटुंब माझी जबाबदारी ते मी जबाबदार; पण सरकारची जबाबदारी केव्हा?”

सर्वात आधी माझं कुटुंब माझी जबाबदारी…आता मीच जबाबदार.. म्हणजे सरकारची काहीच जबाबदारी नाही? अशा प्रकारची अवस्था राज्यात बघायला मिळतेय, असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत उपस्थित चर्चेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी झाल्याचा दावा केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वात आधी माझं कुटुंब माझी जबाबदारी…आता मीच जबाबदार.. म्हणजे सरकारची काहीच जबाबदारी नाही? सरकार हात झटकून मोकळं आहे. आपली पाठ थोपटण्यासाठी तयार आहे. बाकी सगळी जबाबदारी तुम्ही घ्या. मागच्या वेळी सुधीर मुनगंटीवार बोलले ना…सगळी जबाबदारी तुमची आणि उरलेली मोदींची. आमची काही जबाबदरीच नाही अशा प्रकारची अवस्था आपल्याला पहायला मिळत आहे. हा प्रवास आरोग्य व्यवस्थेची थट्टा आहे. 

हेही वाचा- ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याने घेतली कोरोनावरील लस

मंदिरात कोरोना, शिवजयंतीत कोरोना, पण वरळीत पहाटेपर्यंत कुणाच्या आशीर्वादाने बार चालतात, तिथं कोरोना (coronavirus) का येत नाही?  सातत्याने कमी चाचण्या केल्याने महाराष्ट्रात कोरोना वाढला. आजही अतिशय गंभीर स्थिती राज्यात आहे. अमरावतीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट देणारं रॅकेट आहे. नवी मुंबईत ७८०० पॉझिटिव्ह रिपोर्ट विनाचाचण्यांचे आलेत! नुसता सावळा गोंधळ सुरु आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा भ्रष्टाचार करण्याचं काम झालं. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणं कशाला म्हणतात, याचा अर्थ सरकारने समजावून सांगितला.

महाराष्ट्रात मविआ सरकारने कोरोना नीट हाताळला असता तर ९,५५,००० रुग्ण कमी राहिले असते, ३०,९०० मृत्यू कमी झाले असते. आता ही जबाबदारी कुणाची? केंद्र सरकारचा आर्थिक पाहणीचा अहवाल अतिशय बोलका आहे.

सरकार केवळ फेसबुक लाइव्हमध्ये मग्न! पण, २१ फेब्रुवारी २०२१ चं फेसबुक लाइव्ह उत्तम होतं. मुख्यमंत्री म्हणाले, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही. नेमकं हेच सव्वा वर्षांपासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. पण, तुम्हीच सांगितलं हे बरं केलं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधला.

(opposition leader devendra fadnavis slams mva government over covid 19 crisis in maharashtra)

हेही वाचा- लसीचा दुसरा डोस घेऊनही मुंबईतील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह 

पुढील बातमी
इतर बातम्या