Advertisement

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याने घेतली कोरोनावरील लस

तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचं तसंच सहव्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचंही लसीकरण करण्यात येत आहे.

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याने घेतली कोरोनावरील लस
SHARES

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्चपासून सुरु झाला आहे. या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचं तसंच सहव्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचंही लसीकरण करण्यात येत आहे. त्याअंतर्गत ठाकरे सरकारमधील पहिल्या मंत्र्यांने मंगळवारी कोरोनावरील लस टोचून घेतली.

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात होताच सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंबईत कोरोना प्रतिबंधक लस घेतली. तर बुधवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोरोनावरील लस टोचून घेतली. त्यानंतर सोशल मीडियावरून या लसीकरणासंदर्भातील फोटो पोस्ट करत त्यांनी माहिती दिली.

जे.जे.रूग्णालय, मुंबई इथं आज मी कोविड-१९ ची लस घेतली. कोमॉर्बिड (सहव्याधी) असल्यामुळे मला ४५ ते ५९ वयोगटात ही लस देण्यात आली. डॉ. तात्याराव लहाने, डॉ. माणकेश्वर, डॉ. सुरासे, डॉ. संख्ये, ज्यांनी मला लस दिली त्या परिचारिका श्रद्धा मोरे व लस शोधणाऱ्या डॉक्टर्स - वैज्ञानिकांचे आभार!, असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.

हेही वाचा- शरद पवारांनींही घेतली कोरोना प्रतिबंधक लस

महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात लसीकरण मोफत असून, खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी २५० रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. केंद्र शासनाची 'जन आरोग्य योजना' राबविण्यात येणाऱ्या, तसंच, केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असलेल्या मुंबईतील ५३ खासगी रुग्णालयांची यादी महापालिकेला प्राप्त झाली आहे.

सहआजार असलेल्या नागरिकांनी नोंदणीकृत वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यावसायिकांकडून प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र लसीकरण केंद्रात दाखविणं आवश्यक आहे. तर ६० वर्षांवरील नागरिकांनी वयाबाबतचा योग्य पुरावा (कार्यालयीन, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र इ.) सादर करणं आवश्यक आहे. 

'कोविन डिजिटल प्लॅटफॉर्म' हा १ मार्चपासून खुला करण्यात आला आहे. त्यावर नागरिकांना स्वत: नोंदणी करता येत आहे. कोविन पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया सुरळीत होईपर्यत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

(maharashtra cabinet minister uday samant takes covid 19 vaccine dose at jj hospital mumbai)

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा