Advertisement

शरद पवारांनींही घेतली कोरोना प्रतिबंधक लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली.

शरद पवारांनींही घेतली कोरोना प्रतिबंधक लस
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी देखील कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. शरद पवार यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली.

देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्चपासून सुरु झाला आहे. या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनीही दुपारी तीनच्या सुमारास जे. जे. रुग्णालयामध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यानंतर सोशल मीडियावरून या लसीकरणासंदर्भातील व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी माहिती दिली.

“मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोनाची (coronavirus) लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असं आवाहन करतो.” असं आवाहन लसीकरणानंतर शरद पवार यांनी जनतेला केलं.

६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसोबतच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचंही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे.  

हेही वाचा- नवी मुंबईत साडेपाच लाख कोरोना चाचण्या

महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात लसीकरण मोफत असून, खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी २५० रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. केंद्र शासनाची 'जन आरोग्य योजना' राबविण्यात येणाऱ्या, तसंच, केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असलेल्या मुंबईतील ५३ खासगी रुग्णालयांची यादी महापालिकेला प्राप्त झाली आहे.

सहआजार असलेल्या नागरिकांनी नोंदणीकृत वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यावसायिकांकडून प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र लसीकरण केंद्रात दाखविणं आवश्यक आहे. तर ६० वर्षांवरील नागरिकांनी वयाबाबतचा योग्य पुरावा (कार्यालयीन, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र इ.) सादर करणं आवश्यक आहे. 

'कोविन डिजिटल प्लॅटफॉर्म' हा १ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून खुला करण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांना स्वत: नोंदणी करता येणार आहे. मात्र, कोविन पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया सुरळीत होईपर्यत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असंही आवाहन महापालिकेनं केलं आहे.

(ncp chief sharad pawar take first dose of covid 19 vaccine in j j hospital mumbai)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा