
ठाणे (thane) शहरात दररोज निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या पासून खत (fertilizer) निर्मिती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
ओल्या कचऱ्यावर विकेंद्रीत पध्दतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानुसार गायमुख, नागला बंदर, डायघर आणि आतकोली येथे आता टप्याटप्याने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून पहिला प्रकल्प गायमुख (gaimukh) येथे सुरू होणार आहे. तसेच याठिकाणी 100 मेट्रीक टन कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
ठाणे महापालिका (thane municipal corporation) हद्दीत आजच्या घडीला 1100 मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. यात ओल्या कचऱ्याचे प्रमाण जवळ जवळ 60 टक्के एवढे आहे. तर 40 टक्के सुका कचरा आहे.
परंतु कचऱ्यावर शास्त्रोक्तपध्दतीने विल्हेवाट लावण्यात पालिकेला अद्यापही फारसे यश आलेले नाही. परंतु सद्यस्थितीत हिरानंदानी इस्टेट, कोलशेत आणि साकेत या भागात 80 आणि कौसा येथे 10 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे.
परंतु उर्वरीत कचऱ्याचा प्रश्न अद्यापही सुटु शकलेला नाही. महापालिका सध्या भिवंडी येथील आतकोली भागात शहरातील कचरा टाकत आहे.
भविष्यात सुरू होणाऱ्या वीज आणि कोळसा निर्मिती प्रकल्पापूर्वी याठिकाणी आता 600 टीपीडी या क्षमतेचा घनकरचापूर्व प्रक्रिया प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच त्यानुसार यासाठी पुढील 10 वर्षांसाठीची निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर आता याचे कायार्देश देण्यात आले असून कामाला देखील सुरवात झाल्याची माहिती महापालिकेने दिली.
यासाठी 67 कोटींचा खर्च केला जात आहे. याठिकाणी 600 मेट्रीक टन कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. त्यानुसार याचा प्लान्ट उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
यासाठी सुमारे पाच ते सहा महिन्यांचा कालावधी जाणार आहे. या घनकचरापूर्व प्रक्रिया प्रकल्पातून प्लास्टीक व इतर वस्तु या वेगळ्या केल्या जाणार आहेत.
तसेच त्यानंतर दुसऱ्या टप्यात कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच त्यापासून वीज निर्मिती केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
घोडबंदर भागातील गायमुख येथील जकात नाक्याच्या जागेवर कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प आकार घेत आहे. प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून 50 कोटींचा निधी मंजुर झाला असून प्रत्यक्षात कामालाही सुरवात झाली आहे.
गायमुख जकात नाका परिसराचे एकूण क्षेत्रफळ 4800 चौ.मी इतके असून त्यापैकी 4180 चौ.मी जागेवर कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
याठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचे नियोजन आहे. याशिवाय नागला बंदल येथे देखील 100 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
डायघर येथे महापालिका सद्यस्थितीत कचरा टाकत नसली तरी देखील या ठिकाणी महापालिका आता 300 मेट्रीक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. याठिकाणी ब्रिक्स तयार केले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
घोडबंदर भागातील गायमुख येथे ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. त्यानुसार आता घोडबंदर भागातील गृहसंकुले आणि येथील रहिवाशांकडून ओला आणि सुका कचरा वेगळा करुन घेतला जाणार आहे.
तसेच महापालिकेच्या माध्यमातून देखील तशाच पध्दतीने त्या कचऱ्याची वाहतुक करणार आहे. शिवाय ओला कचरा रोजच्या रोज व सुका कचरा आठवड्यातून दोन ते तीन दिवस उचलला जाणार आहे.
हेही वाचा
