शेतकरी मोर्चेकऱ्यांच्या भोजनाची पनवेलकरांनी केली सोय

उन्हातान्हाची तमा न बाळगता देशातील जनतेसाठी शेतात रात्रंदिवस राबणाऱ्या शेतकरी बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज रस्त्यावर उतरून मोर्चा काढला आहे. पाच दिवसापर्यंत उपाशीतपाशी राहून पायपीट करत १८० किमीहून अधिक अंतर कापत या शेतकऱ्यांनी अखेर रविवारी मुंबई गाठलं. पण या शेतकरी मोर्चेकऱ्यांच्या जेवणाचं काय? असा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. तर या शेतकरी बांधवांसाठी पनवेल आणि आसपासच्या गावांमधून तब्बल १ लाख भाकऱ्या आणि ५०० किलो सुकट असं भोजन ग्रामस्थांनी बनवून मुंबईकडे रवाना केलं.

यांनी केली भोजनाची सोय

शेतकरी कामगार पक्ष(शेकाप)नं स्थानिक सरपंचांना सांगून या मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. दरम्यान प्रत्येक सरपंचाला भाकऱ्यांचं टार्गेट देण्यात आलं होतं. त्यानुसार या शेतकऱ्यांसाठी १ लाख भाकऱ्या बनवण्यात आल्या आहेत. याचबरोबर कर्नाळा स्पोर्टस् क्लबजवळ सुकटीचं कालवण बनवून ते मुंबईला रवाना करण्यात आलं. शेतकऱ्यांसाठी भाकऱ्या आणि सुकटीचं कालवण घेऊन निघालेले ट्रक आझाद मैदानात पाठवल्या.

रविवारी मुंबईत दाखल झालेल्या या शेतकरी बांधवांसाठी मुंबईकरांनी देखील पाणी, बिस्किट आणि काही ठिकाणी अन्न पदार्थांचं वाटप करून कृतज्ञता व्यक्त केली.


हेही वाचा - 

काठीहल्ला करा नाहीतर गोळ्या घाला, आता माघार नाही! शेतकऱ्यांचा निर्धार

शेतकरी मोर्चेकऱ्यांना आझाद मैदान परिसरात सार्वजनिक शौचालय नि:शुल्क

पुढील बातमी
इतर बातम्या