सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अचानक सोशल मिडीयाला (Social Media) गुडबाय करण्याचा विचार करत असल्याचं ट्विट केलं. त्यानंतर सोशलमिडीया क्षेत्रात हलकल्लोळ माजला. मोदींच्या या ट्विटमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. मोदी यांनी त्यांच्या वैयक्तिक ट्विटर (Twitter) अकाऊंटवर ट्विट करताना फेसबुक (Facebook), ट्विटर, इन्स्टाग्राम (Insta)आणि यु ट्यूब (You Tube) अकांऊटला गुडबाय करण्याचा विचार व्यक्त केला आहे.
मोदींच्या या निर्णयामागे काय कारण असावं? याचे अनेक तर्क लढवले जात आहेत. दिल्ली हिंसेबाबत मौन बाळगले म्हणून विरोधी पक्षांनी मोदींवर केलेली टीका याचा संबंध याच्याशी जोडला जात आहे. दिल्ली हिंसाचारात अफवांचं आलेलं पिक, अफवा पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा होत असलेला दुरुपयोग हेही यामागचे एक कारण असू शकतं असं सांगितलं जात आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींच्या ट्विटला उत्तर देताना द्वेष सोडा सोशल मिडीया नको असं म्हटलं आहे. तर अनेकांनी तुमच्यामुळे आम्ही ट्विटशी जोडले गेलो, तेव्हा सोशल मिडीया सोडण्याचा विचार करू नका अशी विनंती केली आहे. यावर अनेकांनी मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत.
विशेष म्हणजे मोदी सोशल मिडीयावर टॉप पर्सनॅलिटी असून त्यांचे ट्विटरवर ५ कोटी ३३ लाख, फेसबुकवर ४ कोटी ४५ लाख, इन्स्टाग्रामवर ३ कोटी ५२ लाख फॉलोअर आहेत. २०१९ च्या निवडणुका जिंकल्यावर मोदींनी केलेलं ‘विजय भारत, सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत’ हे ट्विट गोल्डन ट्विट ठरलं होतं. या ट्विटवर १ लाख ८६ हजार रीट्विट आणि ४ लाख १८ हजार लाईक्स मिळाले होते.
आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त हा विचार मांडला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय नरेंद्र मोदी रविवारी देणार आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
हेही वाचा