राज ठाकरेंविरोधात पोस्टरबाजी, मुस्लीम वेशभूषेतील फोटो लावून उपस्थित केला प्रश्नचिन्ह

मशिदिबाहेरील भोंग्यावरून मनसे राज ठाकरे यांनी मंगळवारी सरकारला अल्टिमेटम दिलं. ३ मे नंतर मिशिदिवर भोंगे दिसले तर हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. आता राज ठाकरेंच्या भूमिकेवरून शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी करण्यात आली होती.

पोस्टरद्वारे राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. काल, आज आणि उद्या असे म्हणत प्रश्नचिन्ह टाकत राज ठाकरेंचा मुस्लीम वेशभुषेतील फोटो टाकण्यात आला आहे.

काल मुस्लीम वेशभूषा होती आज हनुमान चालिसा उद्या काय? असा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास हा बॅनर लावण्यात आला होता. पोलिसांनी हे बॅनर काढले आहे.

मनसेच्या गुढी पाडव्या मेळाव्यात राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. मशिदीवरील भोंगे खाली उतरवा अन्यथा आम्ही दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू, असा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिला होता. उत्तरसभेत राज ठाकरेंनी आपली भोंग्याची भुमिका नवीन नाही जुनी आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते.

दरम्यान, राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात मंगळवारी झालेल्या सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवारी ठाण्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाषणापूर्वी राज ठाकरे यांचा ठाण्यातील मनसे पदधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली होती. राज ठाकरे यांनीही ही तलवार म्यानातून बाहेर काढून उंचावली होती. याच कारणावरून आता राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा

"त्याला महत्त्व देऊ नये",अजित पवारांची राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया

सर्व मशिदिंवरील भोंगे ३ मे पर्यंत काढा, नाहीतर - राज ठाकरे

पुढील बातमी
इतर बातम्या