युतीच्या चर्चेत पडू नका, निवडणुकीच्या तयारीला लागा - राज ठाकरे

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेचे नेते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे. आगामी मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.

बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश दिले आहेत. तसेच मनसैनिकांनी युतीच्या चर्चेत पडू नये असे आवाहन देखील राज ठाकरेंनी केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना युतीच्या चर्चेत पडू नका असे स्पष्ट सांगितले आहे. ते म्हणाले की, तुम्ही निवडणुकांच्या कामाला लागा. तुमच्या मनामध्ये विषय येत असेल युतीच काय होणार? युती होईल की नाही ते पुढे बघू . मात्र तुमची स्वतंत्र लढण्याची तयारी असायला पाहिजे. महानगरपालिका निवडणुकांसाठी स्वतंत्र्य लढण्याच्या तयारीत राहा. असे आदेश राज ठाकरेंनी दिले.

मनसेची बैठक संपल्यानंतर सरचिटणीस संदीप देशपांडेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 'निवडणुकींचे, सोशल मीडियाचे, निवडणुकीच्या दिवशीच्या व्यवस्थापन या संदर्भातील समित्या स्थापन करून, तसेच काही लोकांशी संवाद साधून आणि तेथील इच्छुक उमेदवारांशी बोलून त्यांचे मुद्दे काढाणे, उमेदवारांची यादी ठरवणे. अशा अनेक विषयांवर बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. आता सध्या राज ठाकरेंनी आम्हाला स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीनं तयारी करण्याचे आदेश दिलेले आहेत.' असे देशपांडे म्हणाले.

संदीप देशपांडेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'वॉर्ड रचना बदलली असली तरी देखील लोकांची नाराजी बदलू शकत नाही. मराठी माणसं, हिंदुत्ववादी माणसं शिवेसेनेबरोबर आहेत का? मग शिवसेनेला अनुकुल असे कुठले वॉर्ड? मुळात असे काही नाही. आता लोकांची मानसिकता आता शिवसेनेबरोबर नाही. या संपूर्ण कोरोनाच्या काळामध्ये लोकांना जो त्रास झालेला आहे. किती वॉर्ड रचना बदलली तरी आजचं मरण उद्यावर ढकलू शकतील पण मरण अटळ आहे हे निश्चत.' असा टोला देशपांडेंनी शिवसेनेला लगावला आहे.


हेही वाचा

मुंबईत काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने; ‘पेगॅसस’च्या मुद्द्यावरुन आदोलन

‘महाराष्ट्रावर अन्यायाची परंपरा कायम', अजित पवारांची नाराजी

पुढील बातमी
इतर बातम्या