Ganesh Festival 2020: कोकणाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची डागडुजी करा- अशोक चव्हाण

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, अशा स्थितीत कोकणाकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यांचा आढावा घेऊन आवश्यकता असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीचं काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. (pwd minister ashok chavan issue order for road repairing in konkan before ganesh festival 2020

लाॅकडाऊन असला, तरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जाण्याची शक्यता आहे. खासगी वाहने, एसटीचा वापर करून रस्तेमार्गाने चाकरमानी आपापल्या गावी पोहोचतील. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सोयीस्कर व्हावा, यासाठी रस्त्यांची अवस्था चांगली असणं आवश्यक आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कोकणातील राष्ट्रीय महामार्गांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - Ganesh Festival 2020: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सरकारचा मोठा निर्णय

या बैठकीत चारही पालकमंत्र्यांनी कोकणातील राष्ट्रीय महामार्गांच्या जिल्हानिहाय स्थितीबाबत अशोक चव्हाण यांना माहिती दिली. तसंच रस्ते दुरूस्तीसंदर्भात अनेक सूचना मांडल्या. त्यानंतर बैठकीला संबोधित करताना सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात पालकमंत्र्यांसह संयुक्तपणे दौरा करून प्रमुख रस्त्यांची पाहणी करावी. आवश्यकता असेल त्याठिकाणी रस्ते व पुलांच्या दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करून गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी त्याची पूर्तता करावी. पूर्वीपासून प्रगतीपथावर असलेल्या रस्त्यांची कामेदेखील विहित कालावधीत पूर्ण करून घ्यावीत. ज्या ठिकाणी कामे अधिक काळ चालणार आहेत, त्याठिकाणी वळण रस्ता सुस्थितीत असल्याची खातरजमा करून घ्यावी, असं अशोक चव्हाण यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितलं.  

 हेही वाचा - गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची प्रवाशी संघटनांची मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या