अजबच! विरोधकांऐवजी सत्ताधाऱ्यांनीच केला सभात्याग

विधान परिषद असो किंवा विधानसभा, विरोधकांनी सभात्याग केल्याचं आपण अनेकदा पाहिलं असंल. मात्र बुधवारी राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेत सभात्याग केल्याचं पहायला मिळालं.

नेमकं काय रामायण घडलं ?

राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी बोरिवलीतील देवीवाडा झोपडपट्टी येथील 'एसआरए' प्रकरणी झालेल्या घोटाळ्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर उत्तर देत असतानाच विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उभं राहून बोलायला सुरूवात केली.

राज्यातील 'एसआरए' घोटाळा देशभर गाजत असून, त्यातील धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचले आहेत. नियमात नसताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी एका मिलच्या जागेसाठी एका विकासकाला १ हजार कोटी रुपयांचा फायदा होईल, अशी मदत केली, असे सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता राजीनामा देणार का? असा सवाल उपस्थित केला.

त्यामुळं सत्ताधारी संतापले. मात्र विरोधकांनी यावेळी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. त्यामुळं सभागृह १० मिनिटासाठी तहकूब करण्यात आलं. मात्र त्यानंतर पुन्हा सभागृहाचं कामकाज सुरू होताच पळपुट्या सरकारचा धिक्कार असो, असे विरोधीपक्ष घोषणा देत होते. त्यामुळे संतापलेल्या सत्ताधाऱ्यांनी सभात्याग करणं पसंत केलं. यावेळी गिरीश बापट विरोधकांना उत्तर देण्याच्या मनस्थितीत होते. मात्र चंद्रकांत पाटील त्यांना हाताला पकडून घेऊन गेले.

अधिवेशनात शासकीय कामकाजाला विरोधकांनी सहकार्य केले. बुधवारी ३ ते ४ लक्षवेधी झाल्या. मात्र मंत्री काही ऐकून घेण्याच्या आधीच सभात्याग करून बाहेर गेले, असं पहिल्यांदाच घडलं आहे. सत्ताधारी सभात्याग करतात ही दुर्देवी बाब आहे.

 - सुनील तटकरे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

परिषदेत विरोधकांचे संख्याबळ आमच्यापेक्षा जास्त आहे. सभापती आणि उपसभापती देखील त्यांचेच आहेत. अनेक वेळा प्रश्नांची उत्तरे देखील आम्हाला देता येत नाही. त्यामुळं सभात्याग करणं हे प्रासंगिक आहे.

- गिरीष बापट, संसदीय कामकाज मंत्री


हे देखील वाचा -

पाटील, तुम्हाला कवितेत रस हाय काय?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या