तर महाराष्ट्राचं नाव बदलून ‘हे’ ठेवा, ठाकरे सरकारला ‘या’ नेत्याचा सल्ला

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत असताना सत्ताधारी ठाकरे सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षाच्या नेत्याने औरंगाबादचं नाव बदलण्याऐवजी थेट महाराष्ट्र राज्याचंच नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे. 

महाराष्ट्रात शिवसेना (shiv sena), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून ते संभाजीनगर करण्यात यावं, या मागणीने जोर धरला आहे. याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची मागणी देखील होत आहे. परंतु काँग्रेसने या नामांतराला जाहीर विरोध केला आहे. सोबतच रामदास आठवले यांच्या आरपीआय ते देखील औरंगाबदचं नामांतर करण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षाने देखील या नामांतराला विरोध केला आहे.

हेही वाचा- ठाकरे सरकार स्थिर; आपला कार्यकाळ पूर्ण करणार - शरद पवार

यासंदर्भात समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी एक व्हिडिओ जारी करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना औरंगाबदचं नामांतर योग्य नसल्याचं म्हटलं आहे. ते आपल्या व्हिडिओत म्हणतात, माझी महाराष्ट्र सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की, शहरांचं नाव बदलून कधीच शहराची, उन्नती, विकास झालेला नाही वा कुणाचं पोटंही भरलेलं नाही. जुन्या शहरांची नावं बदलून काय साध्य होणार आहे? त्याऐवजी नवं शहर वसवून दाखवावं. महाराष्ट्रात भरपूर जमीन आहे, तिथं दोन ते चार नवे जिल्हे बनवा, तुमचं सहजपणे नाव होईल. परंतु औरंगाबाद, अहमदनगर या जुन्या शहरांचा स्वत:चा इतिहास आहे. नाव बदलून या शहराचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नका. 

नावच बदलायचं असेल, तर महाराष्ट्राचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज असं करा, रायगडचं नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव द्या, जेणेकरून महाराष्ट्रातील जनता खूश होईल. या उलट केवळ इथं राहणाऱ्या मोजक्या लोकांना चिडवण्यासाठी शहरांची नावं बदलू नका. महाराष्ट्रात जगभरातून लोकं येतात, त्यामुळे राज्याचा विकास करा, लोकं तुमच्या नावाने टाळ्या वाजवतील. परंतु उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे शहरांची नाव बदलून हिंदू-मुस्लिम वाद तयार करू नका, अशी विनंती देखील अबू आझमी यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

(samajwadi party mla abu azmi demands to not change aurangabad city name)

हेही वाचा- 'शिवशाही' कॅलेंडरवर उर्दू भाषेतील मजकूर
पुढील बातमी
इतर बातम्या