सत्ताधाऱ्यांना 'चले जाव' म्हणण्याची गरज- संजय निरूपम

देशात सध्या असुरक्षिततेचं वातावरण असून भाजपा सरकार देशभर जातीपातीच्या नावाखाली राजकारण करत आहे. त्यामुळेच समाजामध्ये असुरक्षितता आणि जातीयवाद पसरवणाऱ्या भाजपा सरकारला 'चले जाव' म्हणण्याची वेळ आली असल्याचं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने काँग्रेसने ऑगस्ट क्रांती मैदान ते मणी भवन, गावदेवी दरम्यान तिरंगा मार्चचं आयोजन केलं होतं. यावेळी निरूपम यांनी भाजपावर टीका केली.

काय म्हणाले निरूपम?

समाजात एकोपा निर्माण व्हावा, सांप्रदायिक भिन्नता दूर व्हावी आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना तयार व्हावी, हा तिरंगा मार्चचा मुख्य उद्देश आहे. परंतु सद्यस्थितीत देशभक्तीच्या नावाखाली सत्ताधारी जनतेत द्वेष पसरवत आहेत. परिणामी सामाजिक एकता संकटात आली आहे. 

जाती-पातीच्या नावाखाली पुन्हा एकदा लोकांमध्ये स्पृश्य-अस्पृश्य असा भेदभाव निर्माण केला जात आहे. दलित, अनुसूचित जाती आणि अल्पसंख्यांक नागरिकांवर होणारे हल्ले अतिशय निंदनीय आहेत. त्यामुळे भारतीय जनतेतील रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही हा तिरंगा मार्च काढला आहे.

या तिरंगा मार्चमध्ये माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार नसीम खान, भाई जगताप, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान

या कार्यक्रमात स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसंच स्वातंत्र्यसैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.


हेही वाचा-

देणगी मिळवण्यात शिवसेना नंबर १

तोपर्यंत मेगाभरती नाही - मुख्यमंत्री


पुढील बातमी
इतर बातम्या