Advertisement

देणगी मिळवण्यात शिवसेना नंबर १

प्रादेशिक राजकीय पक्षांना २०१६-१७ मध्ये ६३३९ देणगीदारांकडून ९१.३७ कोटी रुपये मिळाले अाहेत. यामध्ये शिवसेनेला सर्वात जास्त २५.६५ कोटी रुपये देणगी मिळाली अाहे.

देणगी मिळवण्यात शिवसेना नंबर १
SHARES

निवडणुकीत पहिल्या क्रमांकाची मतं मिळवण्यात शिवसेनेला भलेही अपेक्षित यश मिळत नसलं, तरी देशातील प्रादेशिक राजकीय पक्षांमध्ये देणगी मिळवण्यात मात्र शिवसेनाच अाघाडीवर असल्याचं दिसत अाहे. २०१६-१७ या वर्षात प्रादेशिक पक्षांना एकूण ९१.३७ कोटी रुपयांची देणगी मिळाली अाहे. यामध्ये शिवसेनेला सर्वात जास्त २५.६५ कोटी रुपये देणगी मिळाली अाहे. तर देणगी मिळवण्यात अाम अादमी पार्टी (अाप) दुसऱ्या क्रमांकावर असून या पक्षाने २४.७३ कोटींची देणगी मिळवली अाहे. 


एकूण ६३३९ देणगीदार

असोसिएशन फाॅर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर अाली अाहे. प्रादेशिक राजकीय पक्षांना २०१६-१७ मध्ये ६३३९ देणगीदारांकडून ९१.३७ कोटी रुपये मिळाले अाहेत. या देणगीदारांनी २० हजार रुपये अाणि त्यापेक्षा अधिक रक्कम देणगी म्हणून दिल्याचं अहवालात सांगण्यात अालं अाहे. राजकीय पक्षांनी निवडणूक अायोगाला मिळालेल्या माहितीवर अाधारीत हा अहवाल अाहे. 


३ पक्षांना ७२ टक्के देणगी

अहवालानुसार, शिवसेनेला २९७ देणगीदारांकडून २५.६५ कोटींची देणगी मिळाली अाहे. त्यानंतर अापला ३८६५ देणगीदारांनी २४.७३ कोटी रुपये दिले अाहेत. देणगी मिळवण्यात तिसऱ्या स्थानावर शिरोमणी अकाली दल असून पक्षाला १५.४५ कोटी रुपये देणगीस्वरूपात मिळाले अाहेत. प्रादेशीक पक्षांमध्ये मिळालेल्या एकूण देणगीत शिवसेना, अाप अाणि शिरोमणी अकाली दल या तीन पक्षांचा वाटा ७२.०५ टक्के अाहे.


देणगीत वाढ 

प्रादेशिक पक्षांना २०१५-१६ अाणि २०१६ -१७ मध्ये मिळालेल्या देणग्या पाहता, अासाम गण परिषद, शिरोमणी अकाली दल, जनता दल (सेक्युलर), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षांच्या देणगीत वाढ झाली असल्याचं दिसतं. रोख स्वरूपात सर्वाधिक ६५ लाख रुपयांची देणगी ऑल इंडिया एन.आर.काँग्रेसला मिळाली अाहे. तर अासाम गण परिषदला ४१.२ लाख रुपये, नागा पीपल्स फ्रंटला ४१ लाख रुपये रोख देणगी मिळाली अाहे. 



हेही वाचा -

आता मूक नाही तर 'मुख बंद' आंदोलन

Live Updates : महाराष्ट्र बंद, मुंबईत ठिय्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा