प्रशांत किशोर तिसऱ्यांदा पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील गेल्या ४८ तासांतील ही दुसरी तर १५ दिवसांतील तिसरी भेट आहे. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सर्वात पहिल्यांदा प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये ३ तास चर्चा झाली होती. त्यानंतर सोमवारी प्रशांत किशोर यांनी दिल्लीतील निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यापाठोपाठ मंगळवारी पुन्हा एकदा दोघांमध्ये भेट झाल्याने गेल्या ४८ तासांतील दोघांमधील ही तिसरी भेट ठरली आहे.

मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या वतीने यशवंत सिन्हा, सपचे घनश्याम तिवारी, राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, आपचे सुशील गुप्ता, भाकपचे विनय विश्वम, माकपचे निलोत्पाल बसू, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीद मेमन, वंदना चव्हाण आदी नेते उपस्थित होते. शिवाय, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, जावेद अख्तर, काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा, जनता दल (संयुक्त)चे माजी सदस्य पवन वर्मा, निवृत्त न्या. ए. पी. शहा, के. सी. सिंग आदी मान्यवरही होते. मात्र, द्रमुक, बसप, तेलुगु देसम, तेलंगण राष्ट्र समिती तसंच अन्य भाजपविरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. 

हेही वाचा- टाटा रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या सदनिका देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती

ही बैठक म्हणजे बिगरभाजप-बिगरकाँग्रेस अशी तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा प्रसारमाध्यांमध्ये रंगली होती. मात्र ही बैठक राजकीय नव्हती. ही बैठक शरद पवार नव्हे, तर यशवंत सिन्हा यांच्या पुढाकाराने घेण्यात आली होती. राष्ट्रवादी राष्ट्रमंचचा सदस्य असल्याने केवळ आयोजनाचं काम राष्ट्रवादीने पवारांच्या घरी केलं होतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेमन यांनी स्पष्ट केलं.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरून देखील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने भाजपला पराभवाची धूळ चाखली होती. तृणमूल काँग्रेससाठी प्रशांत किशोर यांच्या ‘आय-पॅक’ कंपनीने यशस्वी निवडणूक रणनीती आखली होती. त्यामुळेच तिसऱ्या आघाडीच्या दृष्टीकोनातून ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा- टाटा स्टीलकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात
पुढील बातमी
इतर बातम्या