धाडस असेल तर कदमांवर कारवाई करा, उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

भाजपाचे आमदार राम कदम यांनी महिलांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेकडून कदम यांच्यावर टीका होत असतानाच बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कदम यांची खरपट्टी काढली. कदम, छिंदम आणि परिचारक एका माळेचे मणी आहेत. त्यामुळे भाजपा तसंच मुख्यमंत्र्यांमध्ये धाडस असेल, तर त्यांनी कदम यांच्यावर कारवाई करावी, असं आव्हानही उद्धव यांनी दिलं. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उमेदवारीच देऊ नका

आपण केलेल्या वक्तव्यावर कदम यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. पण त्यांना माफ केल्यानं वाल्याचा वाल्मिकी होणार नाही. याउलट वाल्मिकींचा अपमान होईल. त्यामुळे भाजपानेच नाही, तर कुठल्याही पक्षाने कदम यांना निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, असं उद्धव म्हणाले.

धाडसाने कारवाई करा

बेटी बचाव, बेटी पढाव असा नारा देणाऱ्या भाजपाने आपला कार्यक्रम बदलून बेटी भगाव असा केला आहे का? असा प्रश्न विचारत उद्धव यांनी राम कदम, छिंदम, परिचारक एकाच माळेचे मणी आहेत. आमच्या माता-भगिनी, जवानांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे भाजपा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये धाडस असल्यास त्यांनी कदम यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असं आव्हान मुख्यमंत्र्यांना दिलं.

हार्दिकच्या आंदोलनाला पाठिंबा

हार्दिक पटेल मागच्या १२ दिवसांपासून उपोषणाला बसला आहे. त्याला मी फोन करून उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. तू लढवय्या असून तुझी समाजाला आहे. दहशतवादी, पाकिस्तासोबत बोलणी केली पाहिजे, अशी भूमिका असणाऱ्यांनी देशातील तरूणांसोबतही बोललं पाहिजे. तिथल्या सरकारनेही हा विषय जास्त ताणून न धरता चर्चा करून सोडवायला पाहिजे, असा सल्ला देत उद्धव यांनी देशभरात आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मागणीला शिवसेनाचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं.


हेही वाचा-

"राम नव्हे रावण" - मनसेची राम कदमांविरोधात पोस्टरबाजी

राम नव्हे, हे तर 'रावण' कदम! नवाब मलिक यांची जहरी टीका


पुढील बातमी
इतर बातम्या