आधी शिवनेरी, मग अयोध्या, उद्धव ठाकरे गडावरील माती कलशात भरून नेणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा जवळ आला असून या दौऱ्याची जय्यत तयारी शिवसेना नेत्यांकडून सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यापूर्वी आधी शिवनेरी गडावर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजता उद्धव ठाकरे गडावर जाणार असून गडावरील माती कलशात भरून ती माती उद्धव ठाकरे अयोध्येला नेणार असल्याचंही समजत आहे.

सभेला परवानगी नाही

''हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार'', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे. राम मंदिर बांधण्याच्यादृष्टीनं अयोध्येतील लोकांशी संवाद साधण्यासाठी, त्यांचा मत जाणून घेण्यासाठी ते २४ आणि २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात त्यांची सभा होणार असं म्हटलं जात होतं. पण या सभेला परवानगी न मिळाल्याने आता सभा होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी, शिवसेनेचे दिग्गज नेते अयोध्येला पोहोचले आहेत.

वारकऱ्यांचा पाठिंबा

दरम्यान वारकऱ्यांनीही उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला पाठिंबा दिला असून बुधवारी मोठ्या संख्येनं वारकरी अयोध्येला रवाना झाले आहेत. खा. संजय राऊत, विनायक राऊत, एकनाथ शिंदे आणि राजन विचारेसारखे नेते अयोध्येत पोहचले असून बुधवारी ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम होणार आहे तिथे शिवसेनेकडून पुजा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांचा दौरा तोंडावर आला असून ते अयोध्येला जाण्याआधी शिवनेरी गडावर जाणार आहेत. गडावरील माती कलशात भरून अयोध्येला नेणार आहेत.

महंत नरेंद्र गिरींचा दणका

अखिल भारतीय आखाडा परिषद या साधूसंताच्या सर्वात मोठ्या संस्थेला शिवसेनेकडून अयोध्येतील कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. पण परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी हे आमंत्रण नाकारत शिवसेनेला दणका दिला आहे. हे आमंत्रण धुडकावतानाच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. राम मंदिर ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची केवळ राजकीय खेळी असून या नेत्यांना रामात नाही तर राजकारणात रस असल्याची तिखट प्रतिक्रियाही महंत नरेंद्र गिरी यांनी दिली आहे.


हेही वाचा-

राम मंदिर चुनावी जुमला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला पुन्हा टोला

उद्धव ठाकरे म्हणताहेत, पहले मंदिर फिर सरकार


पुढील बातमी
इतर बातम्या