महाराष्ट्रात दोन शिवजयंती नको, शिवसेना आमदारांची मागणी

राज्यात दोन वेगवेगळ्या तारखांना शिवजयंती साजरी न करता ती एकाच दिवशी साजरी करण्यात यावी अशी मागणी आता शिवसेना आमदारांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.

तिथीनुसार शिवजयंती साजरी न करता ती तारखेनुसारच साजरी केली जावी अशी भूमिका शिवसेना आमदार अंबादास दानवे आणि संजय शिरसाट यांनी मांडली आहे.

“दरवेळी शिवजयंती साजरी होताना काही पक्षांची आणि शिवप्रेमी संघटनांची मागणी होती की शिवजयंती एकाच दिवशी साजरी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात जल्लोष करता येतो. पण दोनदा साजरी केल्यामुळे त्यामध्ये अडथळे येतात. कोणताही एक दिवस हा सरकारने निश्चित केला पाहिजे. दोन शिवजयंती या महाराष्ट्रात नको ही आम्ही सर्वांची भूमिका आहे आणि ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत,” अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

“शिवाजी महाराजांची जयंती वेगवेगळ्या ठिकाणी तारखेनुसार आणि तिथीनुसार केली जाते. आधीच्या काळी तिथीनुसार होत होती आणि आता तारखेनुसार होणाऱ्या जयंतीमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या वेळी शिवजयंती साजरी का होत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे करू,” अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली.

दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका ही शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी व्हावी अशी होती. त्यानुसार राज्यात शिवसेनेकडून तिथीनुसारच शिवजयंती साजरी करण्यात येत होती. गेल्या काही वर्षापासून तारखेनुसारच शिवजयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी समोर येत होती.

त्यानंतर आता शिवसेना आमदारांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्याकडे तारखेनुसारच शिवजयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


हेही वाचा

राज ठाकरेंच्या नावापुढे चक्क हिंदूहृदयसम्राट! चर्चा तर होणारच

पुढील बातमी
इतर बातम्या