“‘पी ३०५’ ही मानवनिर्मित दुर्घटना”

तौंते चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्रात ‘मुंबई हाय’ येथील ओएनजीसीचा ‘पापा ३०५’ हा बार्ज (तेल उत्खनन करणारा निवासी फलाट) सोमवारी बुडाला. या बार्जवर २७३ कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी १८४ जणांना वाचवण्यात नौदलाला यश आलं असून ३७ कर्मचाऱ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना मानवनिर्मित असल्याने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

ओएनजीसी बार्ज बुडून ३७ कर्मचाऱ्यांचा झालेला मृत्यू अत्यंत दुःखद आहे. ही मानवनिर्मित दुर्घटना आहे. तौंते चक्रीवादळाचा धोक्याचा इशारा आधीच दिला होता. धर्मेंद्र प्रधानांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. ७०० कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

मुंबईच्या किनाऱ्यापासून दक्षिणेला ३८ सागरी मैल अर्थात सुमारे ७० किमी अंतरावर हा बार्ज होता. मुंबई हाय येथील खोल समुद्रात हिरा तेल विहिर परिसरात ओएनजीसीचा ‘पापा ३०५’ हा बार्ज आहे. अॅफकाॅन्स कंपनीच्या माध्यमातून इथं तीन विहिरींवर काम सुरू आहे. यासाठी २७३ कर्मचारी कार्यरत होते. 

हेही वाचा- दुर्दैवी! समुद्रात बुडालेल्या बार्जवरील १४ जणांचे मृतदेह हाती, तर १८४ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश

मात्र सोमवारी तौंते चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आलं. १५० किमी वेगाने वारे वाहू लागले आणि ६ ते ८ मीटर उंचीच्या लाटा बार्जला येऊन धडकू लागल्या आणि वरून मुसळधार पाऊस सुरू होता. परिणामी बार्जच्या प्रमुखांनी बचावाचा संदेश पाठवला. त्यानुसार नौदलाने आयएनएस कोलकाता आणि आयएनएस कोच्ची या विनाशिका श्रेणीतील युद्धनौका बचावकार्यासाठी पाठवल्या. रात्रीच्या काळोखात बचावकार्य सुरू असतानाच बार्ज बुडाला.

बार्ज बुडत असताना काही कर्मचाऱ्यांनी समुद्रात उड्या मारल्या, तर काहीजण बार्जसकट समुद्रात गेले. युद्धनौकांना कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणं अवघड जात होतं. सकाळ उजाडल्यावर नौसेनेने बचावकार्याची व्याप्ती वाढवली आणि आयएनएस ब्यास, आयएनएस बेतवा आणि आयएनएस तेग शिवाय सी किंग हेलिकाॅप्टर मदतकार्यासाठी पाठवण्यात आले. तटरक्षक दलानेही समुद्र प्रहरी आणि सामर्थ्य या नौका पाठवल्या.

रात्री उशीरापर्यंत १८४ जणांना वाचवण्यात नौदलाला यश आलं. तर नौदलाला अरबी समुद्रात ३७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह मिळाले आहेत.

हेही वाचा- Cyclone Tauktae : समुद्रात अडकलेलं जहाज बुडालं, २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश

पुढील बातमी
इतर बातम्या