निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सुरवातीला 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याची तयारी केली होती.
मात्र, न्यायलयीन खटल्यांचा पेच निर्माण झाल्याने 24 नगरपरिषदा आणि 154 सदस्यांच्या निवडीसाठी मंगळवारी (2 डिसेंबर) होणारी निवडणूक लांबणीवर पडली आहे.
20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी मिळून दोन्ही टप्प्यांतलं मतदान पार पडल्यानंतर सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले आहेत. या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी अजून निकाल वाचलेला नाही. पण खंडपीठाने दिलेला निकाल सगळ्यांना मान्यच करावा लागेल. मागचे 25 ते 30 वर्षे मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय. पण असं पहिल्यांदा घडतं आहे की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चालल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चालले आहेत. ही जी काही पद्धत आहे ती योग्य वाटत नाही.
ते पुढे म्हणाले की, नागपूर खंडपीठ स्वायत्त आहे निवडणूक आयोगही स्वायत्त आहे त्यांचा निर्णय मान्य करावा लागेल. पण यातून जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, प्रचार करतात त्यांचा भ्रमनिरास होतो. यंत्रणेच्या चुकांमुळे अशा गोष्टी होणं योग्य नाही.
मला वाटतं खूप निवडणुका निवडणूक आयोगाला घ्यायच्या आहेत. या सगळ्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने सुधारणा केली पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
24 नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्यावर ठाकरे गटही नाराजराज्य निवडणूक आयोगाच्या (SEC) निर्णयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मंगळवारी जोरदार टीका केली. IANS च्या वृत्तानुसार, ठाकरे गटाने हा निर्णय “राजकीय गणिती डाव” असल्याचे म्हणत महाराष्ट्रातील लोकशाही प्रक्रिया अस्थिर झाल्याचा आरोप केला.
पक्षाने म्हटले आहे की निवडणूक आयोगाने “आपले भान हरवले आहे” आणि अशा प्रकारे अचानक निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार आयोगाकडे नाही.
‘सामना’तील संपादकीयात निवडणूक आयोगावा ‘जोकर’ संबोधले‘सामना’च्या संपादकीयातून ठाकरे गटाने SEC वर अधिक तीव्र शब्दांत हल्ला केला. निवडणूक आयोग हा “राजकीय खेळातील जोकर” बनला असून, “सरकारने विशेषतः भाजपने निवडणूक आयोगाला आपला जोकर बनवले आहे,” अशी टीका करण्यात आली.
तसेच, हे सर्व “पूर्वनियोजित गोंधळ आणि अराजक” असून त्यामागे “फक्त भाजपला फायदा मिळावा” हा एकमेव हेतू असल्याचा आरोपही संपादकीयात करण्यात आला.
हेही वाचा