सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात, मिळणार ९ महिन्यांचा थकीत 'डीए'

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी जोरात साजरी होणार आहे. कारण राज्यातील सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना गेल्या ९ महिन्यांची महागाई भत्त्या (डीए)ची थकबाकी रोखीनं देण्यात येणार आहे. यासंबंधीचा आदेश नुकताच वित्त विभागाने जारी केला आहे.

शिष्टमंडळाची मागणी

सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी आणि इतर प्रलंबित मागण्याही मार्गी लावव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. या मागणीसाठी महासंघाच्या शिष्टमंडळानं मुनगंटीवार यांची नुकतीच भेटही घेतली होती.

कर्मचाऱ्यांची नाराजी

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार राज्य सरकारनेही महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ केली आहे. प्रत्यक्षात मात्र राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं कारण देत जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतचा महागाई भत्ता थकवण्यात आला आहे. यावरून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे दिवाळीच्या मुहुर्तावर मागील ९ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती.

थकबाकीची रक्कम किती?

अखेर राज्य सरकारने सोमवारी कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेत त्यांची दिवाळी गोड केली आहे. राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांना आणि साडेसहा लाख निवृत्तीधारक कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी दिवाळीत मिळणार आहे. या निर्णयानुसार ३ टक्क्यांप्रमाणे नऊ ९ महिन्यांची थकबाकी आॅक्टोबरच्या वेतनात रोखीनं देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना अडीच हजारांपासून ९ हजारांपर्यंत वर्गावारीनुसार ही थकबाकी मिळणार आहे.


हेही वाचा-

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ

खूशखबर! मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या