सरकारनं आंदोलनात फूट पाडली, मराठा क्रांती मोर्चाचा गंभीर आरोप

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासह अन्य १९ मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. पण आता या आंदोलनात फूट पडल्याचं चित्र आहे. आझाद मैदानावर मराठा आंदोलकांचा एक गट उपोषणासाठी बसला आहे, तर दुसऱ्या एका गटाकडून ठिय्या आंदोलन सुरू आहे. तर आता या दोन गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरूवात झाली आहे. उपोषणास बसलेल्या मराठा ठोक क्रांती मोर्चानं आता ठिय्या आंदोलन करणाऱ्यांना सरकारचे दलाल संबोधलं आहे. एवढंच नव्हे, तर सरकारच मराठा समाजामध्ये, आंदोलनामध्ये फूट पाडत असल्याचा गंभीर आरोप बुधवारी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

तोपर्यंत आंदोलन सुरू

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण करण्यात आलं होतं. गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत, आश्वासन देत हे उपोषण मागे घेण्यास लावलं. त्यानंतर मराठा आरक्षणाच्यादृष्टीनं वैधानिक प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली आहे. गुरूवारी यासंबंधीचं विधेयक सभागृहात मांडलं जाणार आहे. असं असताना मराठा समाजा मात्र आमचा सरकारवर विश्वास नाही असं म्हणत आजही आंदोलन करताना दिसत आहे. जोपर्यंत प्रत्यक्षात आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी आंदोलकांची ठाम भूमिका आहे.

मैदानात ठिय्या

एकीकडे आझाद मैदानात २० नोव्हेंबरपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाचं उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे सोमवार, २६ नोव्हेंबरपासून आझाद मैदानावर काही मराठा आंदोलक ठिय्या मांडून आहेत. मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांकडून संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या संवाद यात्रेचा समारोप २६ नोव्हेंबरला विधानभवनावर होणार होता.

आंदोलक सरकारचे?

मात्र, सरकारनं हे आंदोलन दडपलं, आंदोलकांच्या गाड्या अडवून, आंदोलकांना ताब्यात घेत आंदोलन दडपलं. पण दुसरीकडे मात्र काही आंदोलकांना ठिय्या आंदोलनाची परवानगी कशी मिळाली? असा प्रश्न संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. हे आंदोलक सरकारचे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे दलाल असून तेच आंदोलनामध्ये फूट पाडत असल्याचाही आरोप सावंत यांनी केला आहे.

आम्ही दलाल नाही

सरकारचा, सरकारच्या दलालांचा फूट पाडण्याचा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. सरकारच्या दलालांना लवकरच आझाद मैदानावरून हुसकावू लावू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. आम्ही कुणाचेही दलाल नसून आम्ही मराठा समाजाचे सेवक आहोत. त्यामुळं कुणी कितीही आरोप करोत, त्यांना उत्तर देण्याचीही गरज आम्हाला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया ठिय्या आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पाटील यांनी दिली आहे.


हेही वाचा-

मराठा आरक्षणाचं राजकारण करू नका, आंदोलकांचा नेत्यांना इशारा

मराठा आरक्षण: विरोधकांच्या मनात खोटं, मुख्यमंत्री सभागृहात आक्रमक


पुढील बातमी
इतर बातम्या