सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, रामदास आठवलेंची मागणी

महाराष्ट्रातील वातावरण गढूळ झालं आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. (Union Minister Ramdas Athawale meets retired navy officer Madan Sharma and tells Shiv Sena that Mumbai belongs to everyone)

रामदास आठवले यांनी नुकतीच शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आलेल्या कांदिवलीतील निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात ते म्हणाले, मदन शर्मा यांच्यावर झालेला हल्ला हा जीवघेणा हल्ला होता. त्या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्याने कलम ३०७, ३२६ अन्वये गुन्हा दाखल करणं आवश्यक होतं. मात्र तशी कारवाई न केल्यामुळे हल्लेखोरांना त्वरित जामीन मिळाला.

हेही वाचा- तुम्हाला जमत नसेल तर राजीनामा द्या, माजी नौदल अधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंवर संताप 

ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूडबुद्धीने काम करत आहे. कंगनालाही अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यात वातावरण गढूळ झालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी पुढे आली आहे. या मागणीला रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा असून त्यासाठी आपण केंद्रात प्रयत्न करणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं. 

दरम्यान, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणं तुम्हाला जमत नसेल, तर राजीनामा द्या, अशा शब्दांत माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

मदन शर्मा हे कांदिवलीच्या समतानगर परिसरातील सोसायटीत आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. काही दिवसांपासून टिव्हीवर कंगना आणि शिवसेना नेते असा वाद सुरू होता. या वादातून कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेने कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. अशातच मदन शर्मा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एक व्यंगचित्र सोशल मीडियावर टाकलं. हे व्यंगचित्र पाहून भावना दुखावल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी शर्मा यांच्या सोसायटीबाहेर गर्दी केली. शिवसैनिकांनी शर्मा यांना बोलवून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत शर्मा यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.

हेही वाचा- निवृत नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण, ‘उद्धवजी गुंडाराज थांबवा’ - फडणवीस
पुढील बातमी
इतर बातम्या