मुंबईत एका नौदलाच्या माजी अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर शेअर केल्यानंतर त्याला शिवसैनिकांची चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मदन शर्मा असे त्या निवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे.
हेही वाचाः- Ready reckoner rates: रेडीरेकनरच्या दरांत ‘इतकी’ वाढ
मदन शर्मा हे कांदिवलीच्या समतानगर परिसरातील सोसायटीत आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. काही दिवसांपासून टिव्हीवर कंगना आणि शिवसेना नेते असा वाद सुरू होता. या वादातून कंगनाच्या घरावर तोडक कारवाई पालिकेने केल्याचे बोलले जाते. अशातच मदन यांनी शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एक व्यंगचित्र सोशल मिडियावर टाकले. हे व्यंगचित्र पाहून भावना दुखावल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी शर्मा यांच्या सोसायटीबाहेर गर्दी केली. शिवसैनिकांनी शर्मा यांना बोलवून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत शर्मा यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्याचे फोटो माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेअर करत, ‘एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना आहे. सेवानिवृत्त नेव्हीच्या अधिकाऱ्याने व्हाट्सएपवर संदेश पाठविल्यामुळे गुंडांनी त्यांना मारहाण केली. उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवा. आम्ही या गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो.’ अशी कमेंट केली होती.
हेही वाचाः- लढाई कोरोनाशी: उपाशी राहून कसं चालेल?
या घटनेची गंभीर दखल घेत समतानगर पोलिसांनी शर्मा यांचे घर गाठून त्यांचा जबाब नोंदवला. शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपीं विरोधात कलम ३२५,१४३,१४७,१४९ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करून चौघांना जणांना अटक केली आहे. शर्मा यांची मुलगी शिला हिने प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, वडिलांनी मेसेज फॉरवर्ड केल्याने त्यांना धमक्या देण्यात आल्या. तसेच काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी घरी येत वडिल त्यांच्यासोबत गेले. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली.