Advertisement

लढाई कोरोनाशी: उपाशी राहून कसं चालेल?

त्या खाण्याचं पॅकेट घेऊन रांगेतून परत आल्या. स्वतःच्या बेडपाशी त्यांनी ते ठेवलं आणि तशाच पुढे आल्या. पदराखालून आणखी एक पॅकेट काढून त्यांनी ते मला दिलं आणि म्हणाल्या, ‘हे घ्या आणि खा. उपाशी राहून कसं चालेल बाबा?

लढाई कोरोनाशी: उपाशी राहून कसं चालेल?
SHARES

शास्त्रीनगर रुग्णालयात  मुश्कीलीनं २४ तासच होतो. पण तेवढ्यातही अनेक अनुभव आले. संध्याकाळच्या सुमारास कल्याणमधल्या एका खासगी रुग्णालयात मला हलवण्यात आलं. त्यामागचं कारण तेव्हा मला माहिती नव्हतं. तुमचा पेशंट क्रिटिकल होतोय. व्हेंटिलेटर असलेल्या कुठल्याही रुग्णालयात त्याला हलवा, असं सांगण्यात आल्यामुळे मुक्काम पोस्ट बदलावा लागला, हे मला नंतर समजलं...

सकाळी नाश्त्यानंतर पुन्हा झोप लागली. त्यानंतर पुन्हा ऋतुजाशी फोनाफोनी, चॅट्सवर बोलत होतोच. तितक्यात जेवण आलं. म्हणजे त्या हॉलच्या दाराशीच ठेवलेल्या टेबलावर जेवणाची पॅकेट्स आणून ठेवण्यात आली होती. मग कुणी तरी ‘खाना आया है, ले लो...’ असं ओरडलं आणि एकच धांदल उडाली. खाण्याचं ते पॅकेट मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली. मग रांग लागली... मी तो प्रकार बघून हतबुद्ध झालो होतो. त्याही परिस्थितीत मला गेल्या वर्षीच्या पावसाळ्याची आठवण झाली. टिटवाळ्यातल्या काही पूरग्रस्त भागात आम्ही काही मित्रांनी मिळून अन्न-धान्य, बिस्किटं वगैरे गोष्टींचं वाटप केलं होतं. तेव्हा मी टेबलाच्या त्या बाजूला होतो. आज बाजू बदलून जेवण मिळवण्यासाठी मला रांगेत उभं रहावं लागणार होतं... 

बहुधा माझ्या डोळ्यांत पाणी आलं असावं. काहीच सुचत नव्हतं. नाकातून ऑक्सिजनची नळी काढून त्या रांगेत जाऊन उभं राहू की रांग संपत आल्यावर जाऊ हा विचार करत मी बसलो होतो. माझ्या उजव्या बाजूला चार-पाच पावलांवर असलेल्या बेडवर एक बाई होत्या. बॉबकट ते बॉयकटच्या दरम्यान केस असणाऱ्या टिपिकल दाक्षिणात्य महिलांसारख्याच त्या बाई होत्या. ओळखीच्या ना पाळखीच्या... बहुधा त्यांना माझी दया आली असावी. त्या खाण्याचं पॅकेट घेऊन रांगेतून परत आल्या. स्वतःच्या बेडपाशी त्यांनी ते ठेवलं आणि तशाच पुढे आल्या. पदराखालून आणखी एक पॅकेट काढून त्यांनी ते मला दिलं आणि म्हणाल्या, ‘हे घ्या आणि खा. उपाशी राहून कसं चालेल बाबा? तुम्हाला इथे रहायचं तर असं चालणार नाही. काय हवं ते ओरडून सांगावं लागेल. मागावं लागेल. नाही तर काहीच मिळणार नाही...’

हेही वाचा- लढाई कोरोनाशी: शास्त्रीनगर रुग्णालयातली रात्र...

हातातल्या जेवणाच्या पॅकेटकडे बघून मी त्या माऊलीकडे पाहिलं. डोळ्यांतल्या पाण्यामुळे तिचा चेहरा धूसर दिसत होता. मी हात जोडणार तितक्यात हलकेच हसत माझ्या भावनांचा स्वीकार केल्यागत हात वर करून ती माऊली तिच्या बेडकडे वळलीही... हातून तोपर्यंत घडलेल्या चार-दोन चांगल्या कामांचं ते फळ असावं किंवा माझी कुलदेवता त्या माऊलीच्या रुपानं माझ्यासाठी उभी राहिली असावी. ती माऊली नसती, तर माझी नक्कीच उपासमार झाली असती. त्या माऊलीसाठी मी कायमच कृतज्ञ राहीन. शक्य झालं तर तिला शोधून आभारही मानायचे आहेत. अर्थात यानंतरही, त्या पॅकेटमध्ये काय होतं, मी काय खाल्लं हे काही मला आठवत नाही ते नाहीच.

हे सगळं झाल्यावर पुन्हा बहुधा डुलकी लागली. पुन्हा एकदा सिलिंडर संपलं. पुन्हा एकदा काही काळ थांबल्यावरच दुसरं सिलिंडर आलं. तोवर माझ्या केडीएमसीतल्या अधिकारी मित्रानं नंबर दिलेल्या डॉक्टरांशीही संपर्क झालेला होता. रात्रीच की सकाळी की कधी ते आठवत नाही. पण माझा स्वॅब घेऊन कोव्हिड टेस्टसाठी पाठवण्यातही आलेला होता. संध्याकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास ऋतुजाचा फोन आला. तुला कल्याणला खासगी रुग्णालयात नेण्यासाठी मी येतेय असं तिनं सांगितलं. कोव्हिड रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचंही ती म्हणाली. मी आवरा-आवर करून तिची वाट बघत बसलो. ती आली, पुन्हा व्हीलचेअरवरून त्याच लिफ्टमधून खाली जाऊन रुग्णवाहिकेतून कल्याणला एका खासगी रुग्णालयाचा प्रवास सुरू झाला. अर्थातच ऑक्सिजनशिवाय. खाली आल्यावर साडू आणि मेव्हणी भेटल्याचंही आठवतंय त्याला मी ओआरएस आणून दे सांगितलं, तेही आठवतंय... रुग्णवाहिका गेटबाहेर पडली आणि शास्त्रीनगर रुग्णालयातला बरंच काही शिकवणारा मुक्काम संपला. क्रमश:

- दिनार पाठक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा