Advertisement

लढाई कोरोनाशी: शास्त्रीनगर रुग्णालयातली रात्र...

तिथले २४ तास आयुष्यात कधीच विसरता येणार नाहीत. त्या मुक्कामातल्या सगळ्या गोष्टी तपशीलवार आठवत नाहीत, ही चुटपूट मात्र मनात नेहमी राहील.

लढाई कोरोनाशी: शास्त्रीनगर रुग्णालयातली रात्र...
SHARES

शास्त्रीनगर रुग्णालयातला मुक्काम चांगलाच लक्षात राहाणारा ठरला. पण एका अर्थी तो माझे डोळे उघडणाराही ठरला. समोर काय वाढून ठेवलंय याची नीट कल्पना तिथेच आली. त्यामुळे मन कणखर करून लढल्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीवही झाली. त्यामुळे तिथले २४ तास आयुष्यात कधीच विसरता येणार नाहीत. त्या मुक्कामातल्या सगळ्या गोष्टी तपशीलवार आठवत नाहीत, ही चुटपूट मात्र मनात नेहमी राहील.

शरीराचं कौतुक कितीही केलं तरी कमीच पडतं, मनुष्याला सवयी पटकन लागतात... असली टिपिकल उपदेशी स्वरुपाची वाक्यं आपण नेहमीच ऐकतो. पण अवघ्या काही तासांत मी बाहेरून दिल्या जाणाऱ्या ऑक्सिजनवर किती अवलंबून आहे, हे मला नळीतून येणारा प्राणवायू थांबल्यावर जाग आल्यानं समजलं. अर्थात, कोरोनाच्या व्हायरसमुळे तो ऑक्सिजन मिळणं खूपच गरजेचं होतं, हे माहिती नव्हतंच आणि तोवर मी कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्टही झालेलं नव्हतं. 

हेही वाचा - लढाई कोरोनाशी: मुक्काम पोस्ट शास्त्रीनगर रुग्णालय

मला मिळणारा ऑक्सिजन बंद झालाय, हे मी कसं-बसं ड्युटीवर असलेल्या नर्स वगैरेंना सांगितलं. त्यापैकी कुणी तरी येऊन सिलिंडरपाशी काही तपासलं आणि शांतपणानं सांगितलं की, सिलिंडर संपलंय. मग दुसरा सिलिंडर लावा पटकन, मला त्रास होतोय या माझ्या सांगण्यावर पहाटे गाडी येते, त्यातून सिलिंडर आलं की, लावू दुसरा सिलिंडर असं तितक्याच शांतपणे सांगून आलेली व्यक्ती निघून गेली. हा प्रकार झाला तेव्हा किती वाजले होते, माहिती नाही. पण २५ जुलैच्या पहाटे ३ वाजून ३९ मिनिटांनी ऑक्सिजन सिलिंडर खतम असा मेसेज मी ऋतुजाला पाठवला होता. ऑक्सिजन मिळत नसल्यानं झोप लागत नव्हती. शेवटी उठलो, भेलकांडत साधारण चाळीसेक पावलं चालून निसर्गाच्या हाकेला ओ देऊन आलो. कसा गेलो आणि आलो, काय माहिती. बेडपर्यंत पोहोचलो आणि आडवा पडलो. पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यानं डोकं काम करेनासं झालं होतं. धापा टाकल्यागत श्वासोच्छ्वास सुरू होता. त्यातच ग्लानी आल्यासारखं झालं होतं. खरं सांगायचं तर आजूबाजूचं जगच धूसर झालं होतं. मग अचानक ऑक्सिजन सिलिंडरचा आवाज झाला. दुसरं सिलिंडर आलं होतं... ते लागल्यावर नाकातल्या नळीतून पुन्हा प्राणवायू मिळू लागला आणि कधी-तरी पुन्हा झोप लागली. 

सिलिंडर संपल्याच्या माझ्या मेसेजला पुढच्याच मिनिटाला ऋतुजाचा रिप्लाय आला होता. जागीच असावी ती. तिच्या मेसेजेसना सकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी रिप्लाय केला. म्हणजे मी त्याच सुमारास उठलो असणार. ७.१७ पर्यंत आम्ही बोलत होतो. तिनं काही डॉक्युमेंट्सही मला पाठवून ठेवली. मग पावणेदहाच्या सुमारास उपमा खाल्ला, आता बरंच बरं वाटतंय असं मी तिला कळवलं. पण उपमा खाल्ला होता वगैरे मला आठवत नाहीच. मात्र, त्या अवस्थेतही मी रुग्णालयात काय काय चाललंय, ते ऋतुजाला सांगू शकत होतो. एखाद-दोन असंबद्ध मेसेज सोडले, तर बऱ्यापैकी बुद्धी ताळ्यावर राहिली होती. हे कसं शक्य झालं असावं, या प्रश्नाला माझ्यापुरतं उत्तर देवाची कृपा हेच राहील.

देवाच्या कृपेवरून आठवलं. सकाळी कधी तरी जाग आल्यावर उठून बेडवर बसलो. मनात पहिला विचार आला की, मी जिवंत आहे. कोव्हिडचा विषाणू फुफुस्सापर्यंत पोहोचला की, त्याचा गुणाकार होतो असं कुठे तरी वाचल्याचं आठवलं. तो गुणाकार सुरू असतानाच सिलिंडर संपलं आणि काही काळ मला ऑक्सिजन मिळत नव्हता. तरीही आपण जिवंत आहोत, हा बहुधा देवानं म्हणा की दैवानं दिलेला संकेतच असावा असा अर्थ मी घेतला. त्याच क्षणी निश्चय करून टाकला की, रिपोर्ट निगेटिव्ह आला तर ठीकच. पण आपल्याला कोरोना झालेला असेलच, तर आपण लढायचं. सगळी ताकद पणाला लावून लढायचं...

२५ जुलैच्या सकाळीच मन असं खंबीर केल्याचा फायदा काय, ते मला नंतर समजणार होतं... क्रमश:

- दिनार पाठक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा