Advertisement

लढाई कोरोनाशी: मुक्काम पोस्ट शास्त्रीनगर रुग्णालय

लिफ्टच्या दाराकडे पाठ होती आणि मागचा दरवाजा बंद झाला होता. समोर लिफ्टची भिंत होती. मजल्यावर जाऊन लिफ्ट थांबल्यावर दार उघडलं तरी मी कुणी तरी येईपर्यंत तसाच बसून होतो... जणू काही मागची दारं बंद झालीयेत हा संकेतच होता तो...

लढाई कोरोनाशी: मुक्काम पोस्ट शास्त्रीनगर रुग्णालय
SHARES

२४ जुलैला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल झालो. व्हीलचेअरवर बसून प्रवेशाचे सोपस्कार पूर्ण होण्याची वाट बघत होतो. ते झाल्यावर रुग्णालय कर्मचाऱ्यांपैकी कुणी तरी व्हीलचेअर लिफ्टपर्यंत ढकलत नेली. व्हीलचेअर लिफ्टमध्ये जाताच मजल्याचं बटण दाबून दार बंद झालं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, मी लिफ्टमध्ये एकटाच आहे. लिफ्टच्या दाराकडे पाठ होती आणि मागचा दरवाजा बंद झाला होता. समोर लिफ्टची भिंत होती. मजल्यावर जाऊन लिफ्ट थांबल्यावर दार उघडलं तरी मी कुणी तरी येईपर्यंत तसाच बसून होतो... जणू काही मागची दारं बंद झालीयेत हा संकेतच होता तो...

पत्रकारितेत सरकारी रुग्णालय आणि तिथला कारभार वगैरे स्वरुपाच्या बातम्या कित्येकदा हाताखालून गेल्या होत्या. तिथले गैरप्रकार, भ्रष्टाचार, अनागोंदी वगैरे वगैरे खमंग, चटपटीत बातम्यांच्या मालिका वाचकांना भिडतील, असा प्रयत्न पत्रकार म्हणून काम करणारा कुणीही नेहमीच करतो. पण मी पत्रकार म्हणून नव्हे, तर पेशंट म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल झालो होतो... रुग्णालयाकडे बघण्याचा चष्मा बदलला होता. साहजिकच अनुभवही बदलणार होते. त्याची सुरुवात लिफ्टपासूनच झाली होती. लिफ्टमध्ये व्हीलचेअरवर बसून कुणी तरी आपल्याला ढकलत बाहेर काढेल, याची मी वाट बघत होतो. पुढचे काही तास मला अनेक गोष्टींची प्रतीक्षा करायची होती. त्याची नांदी झाली होती...

हेही वाचा - हेही वाचा - लढाई कोरोनाशी: कोव्हिडचा हल्ला!

अखेर कुणी तरी आलं आणि त्यांनी मला लिफ्टमधून बाहेर काढून वॉर्डच्या दारापर्यंत ढकलत नेलं. तिथे ऋतुजा जिन्यानं पोचलेली होती. बेड समोर दिसत होता. घरापासून तिथपर्यंत पोहोचेस्तर मी बऱ्यापैकी थकलो होतो. त्याचं कारण अंगातली झपाट्यानं कमी होत चाललेली ऑक्सिजन लेव्हल हे होतं आणि तेही मला माहिती नव्हतंच. म्हणजे ऑक्सिजन लेव्हल कमी आहे, हे दुपारीच समजल्यामुळेच रुग्णालयापर्यंत पोहोचलो होतो. पण घरातून निघतानाची लेव्हल बऱ्यापैकी कमी झाली आहे, हे प्रवासात समजलेलं नव्हतं. समोर बेड दिसत असल्यानं पडावं असं वाटू लागलं होतं. पण व्हीलचेअर तिथपर्यंत नेण्यासाठी कुणी तरी येईल, याची प्रतीक्षा सुरू होती. अखेर मी तिथल्या नर्सना सांगितलं आणि चालत बेडपर्यंत गेलो. साधारण ३०-४० पावलांचं ते अंतर होतं. मी बेडवर जाऊन पडल्यावर मात्र पुढचे सोपस्कार लगेचच सुरू झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाकातून नळीवाटे ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाला. त्यामुळे पाचेक मिनिटांतच मला हुशारी वाटू लागली. अंगावर पांघरायला चादर घेतलेली नव्हती. ऋतुजानं फोनाफोनी करून व्यवस्था केली आणि चादरही माझ्यापर्यंत पोहोचवली.

या सगळ्याला किती वेळ लागला, हे मात्र माझ्या गावीही नव्हतं. याचं कारण मला नंतर समजलं. ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्यामुळे रक्ताद्वारे शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचणारा ऑक्सिजन कमी पडत होता. त्याचा परिणाम मेंदू, हृदय असा सगळीकडे होऊ शकतो कारण पेशींमधला प्राणवायूच कमी झालेला असतो. वैद्यकीय भाषेत हायपोक्सेमिया. त्यामुळेच मला काही गोष्टी तपशीलानं आठवत होत्या तर काही अजिबात लक्षात येत नव्हत्या. जसं की, तिथे मला सलाइन देण्यात आलं होतं का किंवा त्या रात्री मी जेवलो की नाही किंवा नंतर ऋतुजानं सांगितल्याप्रमाणे रुग्णालयात प्रवेश ते मला बेडवर ऑक्सिजन मिळू लागण्यात साधारण तासभर गेला होता...

असो. मला ऑक्सिजन मिळू लागल्याचं पाहून ऋतुजा घरी गेली. ऑक्सिजन सुरू झाल्यानंतर मलाही जरा हुशारी आली होती. मग मी आजूबाजूला काय आहे, हे बघायला सुरुवात केली. रुग्णालयातला तो एक खूप मोठा हॉल होता. किमान ५०-६० रुग्ण तिथे होते. फोन चार्जिंगला लावला आणि तो हॉल बघता बघता कधी डोळा लागला, ते समजलंच नाही. 

अचानक जाग आली. कारण नळीतून नाकात येणारा ऑक्सिजन बंद झाला होता... क्रमश:

- दिनार पाठक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा