Advertisement

लढाई कोरोनाशी: कोव्हिडचा हल्ला!

वैद्यकीय भाषेत सांगायचं तर माझी अवस्था क्रिटिकल होती. फुफुस्सांचं ७५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेलं होतं. अस्तित्वाची लढाई असल्याचं माहितीही नव्हतं आणि मला लढायचं होतं... कोरोनाशी खंबीरपणे लढा देणाऱ्या योद्ध्याचा प्रेरणादायी अनुभव सांगणारी मालिका..

लढाई कोरोनाशी: कोव्हिडचा हल्ला!
SHARES

निगेटिव्ह हा या वर्षातला सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह शब्द ठरलाय. आज कोव्हिड-१९ निगेटिव्ह आहे, हे सांगताना मला अतीव समाधान आणि आनंद वाटतोय. पण त्यासाठी मला जीवाच्या आकातांनं लढावं लागलं. कोव्हिडनं माझ्या फुफुस्सांवर जबरदस्त हल्ला केला होता. वैद्यकीय भाषेत सांगायचं तर माझी अवस्था क्रिटिकल होती. फुफुस्सांचं ७५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेलं होतं. अस्तित्वाची लढाई असल्याचं माहितीही नव्हतं आणि मला लढायचं होतं. 

त्याचीच ही दास्तान...

कोरोना आणि कोव्हिड १९ हे शब्द साधारण जानेवारी-फेब्रुवारीत ओळखीचे झाले. चीनमध्ये अवतरलेला हा विषाणू आपल्यापर्यंत येईल असं वाटत नसल्याची चर्चा सुरू असताना तो जगभर पसरला. जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला जागतिक महामारीच्या पंक्तीत बसवलं. मार्चमध्ये भारतात लॉकडाउन झाला, तोपर्यंत इटली, स्पेनसह अनेक देशांत रुग्णांचे आणि मृतांचे आकडे दहशत निर्माण करणारे होते. आपल्याकडेही मुंबईसह राज्यात आकडा वाढू लागला. कोरोनाचं लोण ठाण्यापुढे डोंबिवली-कल्याणातही पसरलं. तरी टिटवाळ्यात फारसे रुग्ण नव्हते. पॉझिटिव्ह आढळले, त्यातले ८० टक्के विविध सरकारी कर्मचारी आणि पोलिस होते, ज्यांना नोकरीसाठी मुंबई-ठाण्याला जावं लागत होतं. प्रदूषणमुक्त टिटवाळ्यातले रहिवासी बऱ्यापैकी निर्धास्त होते. 

मीसुद्धा त्यातलाच एक होतो. मे, जून अगदी अर्धा जुलै महिनाही संपला. घरून काम सुरू होतं. घरासमोरच भाजीचं दुकान, शेजारीच वाणसामानाचं दुकान आणि दूधही त्यांच्याकडूनच येत असल्यामुळे घराबाहेर फारसं पडावं लागतंच नव्हतं. रात्री दुधासोबत यादी दिलेलं किराणा सामानही येत होतं. व्यवहारही ऑनलाइन सुरू होते. कोरोनाचं सावट असलं, तरी रोजचं आयुष्य नेहमीपेक्षा बदलललं होतं. पण जगच न्यू नॉर्मल होताना ते स्वाभाविकच होतं. 

पुढे काय वाढून ठेवलंय हे माहिती नसताना मनुष्य सुखात जगतो. न्यू नॉर्मल आयुष्याची सवय होताना मीही तसाच होतो. अनेकांप्रमाणेच आर्थिक आघाडीवर काही फटका मलाही बसत होता. पण अगदी खरं सांगायचं तर महिन्याला किती खर्च वायफळ होत होता, याचीही जाणीव होत होती आणि महिन्याला होणारा खर्च किती तरी कमी झाल्यानं आर्थिक शिस्त लागतेय याचा कुठे तरी आनंदही होता. कुटुंबात काही संकटाचे प्रसंगही नेमके याच सुमारास आले. मेव्हणी चालवत असलेली दुचाकी रस्त्यात सांडलेल्या कचऱ्याच्या गाडीतून पडलेल्या पाण्यातून घसरून तिच्या गुडघ्याचं प्रचंड नुकसान झालं. शस्त्रक्रिया वगैरे दिव्य कोरोनाच्या काळात पार पडलं. 

सुशांतसिंगची आत्महत्या आणि कोरोनाच्या वाढत्या आकड्याचं टेन्शन अनेकांना येत होतं. मेडिटेशन करा, व्यायाम करा, टेन्शन घेऊ नका, राग-लोभ लांब ठेवा आणि फक्त सकारात्मक गोष्टींचाच विचार करा असं मित्र, परिचितांना सांगत होतो...

एके दिवशी संध्याकाळी एटीएमला जावं लागलं. खबरदारी घेतली होतीच. मास्क, खिशात सॅनिटायझरची बाटली वगैरे. हाताला सॅनिटायझर लावूनच एटीएममध्ये गेलो. पैसे काढले. बाहेर आलो. परत हाताला सॅनिटायझर लावलं. तिथून मेडिकलमध्ये गेलो. एक मलम घेतलं. ते घेताना देणाऱ्याच्या हाताचा माझ्या हाताला नकळत स्पर्ष झाला. मी लगेचच हाताला पुन्हा सॅनिटायझर लावलं. मगच पैसे आणि मलम सोबतच्या पिशवीत टाकलं. नंतर घरी आलो.

लढाईचं बिगुल...

पुढचे दोन-चार दिवस नेहमीसारखेच होते. पण नंतर मला कणकण वाटली. एक दिवस पाहू म्हणून घरात होती ती डोलोची गोळी खाल्ली आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी तपासलं. ताप वगैरे नव्हता. त्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी दुपारी बोलता बोलता अचानक मला एकदम दीर्घ श्वास घ्यावा लागला. धावलो किंवा धावत जिना वगैरे चढलो तर धाप लागून बोलताना एखादा शब्द अडकावा तसं झालं.

तो कोव्हिडचा अत्यंत प्रखर हल्ला होता. विषाणू थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचला होता. अर्थात यातलं मला काहीच माहिती नव्हतं आणि मला जगण्यासाठी या जीवघेण्या विषाणूसोबत लढावं लागणार होतं... क्रमश:

- दिनार पाठक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा