Advertisement

लढाई कोरोनाशी: घर ते शास्त्रीनगर रुग्णालय

२५ तारखेला संध्याकाळी स्वॅब टेस्टचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आणि लढाई कोव्हिड १९च्या विषाणूशीच असल्याचं स्पष्ट झालं. किमान लढाईची दिशा ठरली होती.

लढाई कोरोनाशी: घर ते शास्त्रीनगर रुग्णालय
SHARES

श्वास घेण्यात अडचण येऊ लागल्यानंतर घराजवळचं एक खासगी रुग्णालय, सरकारी आरोग्य केंद्र असा प्रवास करून डोंबिवलीतल्या महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल झालो. कोरोनाच झालाय का, हे तपासण्यासाठी २४ जुलैला सुरू झालेली ही धडपड होती. २५ तारखेला संध्याकाळी स्वॅब टेस्टचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आणि लढाई कोव्हिड १९च्या विषाणूशीच असल्याचं स्पष्ट झालं. किमान लढाईची दिशा ठरली होती...

कोव्हिडचा हल्ला झालेला माझ्या गावीही नव्हतं. पुढे काय होणार याची काही कल्पना असल्याचंही कारणं नव्हतं. दुपारी एकदा दीर्घ श्वास घ्यावा लागला आणि थोड्या वेळानं मला परत तसंच दोन-चारदा झालं. मग पत्नी, ऋतुजाशी बोललो आणि दवाखान्यात जाऊया असं ठरवलं. जवळच असलेल्या एका अद्ययावत वगैरे वगैरे रुग्णालयात गेलो. सगळे ओळखी-पाळखीचे असूनही तिथे काहीच उपचार मिळणार नाहीत, हे पाच मिनिटांतच स्पष्ट झालं. मग टिटवाळा पश्चिमेस असलेल्या सरकारी उपचार केंद्रात गेलो. स्थानिक महापालिकेत परिचयाचे अधिकारी-कर्मचारी बरेच आहेत. त्यापैकी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कल्पना दिल्यानं त्यांनी त्या केंद्रात फोन करून ठेवला होता. तिथेही थर्मल गनने शरीराचं घेतलेलं तापमान नॉर्मलच होतं... आणि श्वास चुकण्याचं प्रमाण वाढत चाललं होतं. खरं सांगायचं तर श्वास घेणं मुश्कील होत चाललेलं होतं. 

हेही वाचा - लढाई कोरोनाशी: कोव्हिडचा हल्ला!

कोव्हिड टेस्ट करायची आहे असं वैद्यकीय केंद्रातल्या कर्मचाऱ्यांना सांगितल्यावर आजच्या टेस्टची वेळ संपल्याचं त्यांनी शांतपणानं सांगितलं. टेस्ट आणि रिपोर्टशिवाय माझ्यावर कुठल्याच रुग्णालयात उपचार होऊ शकणार नाहीत, हे त्यांना सांगितल्यावरही त्यांचा प्रतिसाद कोरडाच होता. अखेर, इथे नाही तर कुठे टेस्ट होईल, असं विचारता त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचं डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर रुग्णालय असं उत्तर दिलं. घरी आलो. परत फोनाफोनी केली. काही मित्रांकडून कल्याणच्या काही खासगी रुग्णालयांचे पर्याय सुचवण्यात आले. पण केडीएमसीतल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी बोलून शास्त्रीनगर रुग्णालयातच जाण्याचं ठरवलं. एकदा रिपोर्ट आला की, पुढे पाहू. पॉझिटिव्ह असलोच, तर सावळाराम संकुल येथे तातडीनं हलवू असं आश्वासन त्या अधिकाऱ्यांनी दिलं. दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या पाटीदार येथील कोव्हिड सेंटरचा पर्यायही होताच.

मी कुठल्या परिस्थितीत आहे याची कल्पनाच नसल्यामुळे गाडी चालवण्यासाठी एका मित्राला बोलावून डोंबिवलीपर्यंत घरच्या गाडीनंच जायचं ठरवलं. तोवर घरीच एक्स-रे काढून घेतला होता आणि त्याचा रिपोर्ट न्यूमोनियाची शक्यता असा होता. तो रिपोर्ट आणि काही कपडे घेऊन मी, ऋतुजा आणि गाडी चालवण्यासाठी आलेला अमेय नावाचा मित्र असे आम्ही तिघे शास्त्रीनगर रुग्णालयाकडे निघालो.

पाऊण-एक तासाच्या त्या प्रवासाच्या आठवणी धूसर आहेत. म्हणजे, अमेयला मी डोंबिवली पश्चिमेला कसं जाणार आहेस, या रस्त्याला नो एंट्री वगैरे आहे, तू इतका उंच असून सीट मागे का करत नाहीयेस असं काय काय बोलल्याचं आठवतंय... पण कल्याणमधून गाडी कुठल्या रस्त्यानं डोंबिवलीपर्यंत गेली, ते काही केल्या आठवत नाही. जाताना पत्रीपूल लागला होता आणि पूल संपताच उजवीकडे वळण घे, असं सांगितल्याचंही आठवतंय. मध्येच राहुल चाटुफळे नावाच्या मित्राशी फोनाफोनी सुरू होती. तो ठाण्याहून घरी येताना मध्येच कल्याणला उतरून माझ्यासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात येणार होता. तू नेमका कुठे आहेस-आम्ही इथे आहोत अशी बरीच फोनाफोनी झाल्यावर अखेर गेटपाशीच भेटू असं ठरलं... त्यानुसार तो भेटलाही. ऋतुजानं प्रवेशाचे सोपस्कार आटोपले. मी रुग्णालयात दाखल होण्यासाठी येतोय हे तिथे आधीच सांगून ठेवण्यात आलेलं होतं. त्यामुळे सोपस्कारांत फार वेळ गेला नाही. तोपर्यंत मला पेशंट म्हणून व्हीलचेअरवर बसवण्यात आलं होतं... व्हीलचेअरवर बसण्याचा तो आयुष्यातला पहिला प्रसंग. 

पण असे बरेच पहिले अनुभव माझी वाट बघताहेत, हे तेव्हाही मला कुठे माहिती होतं... क्रमश:

- दिनार पाठक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा