Advertisement

कमी कोरोना चाचण्यांमुळे महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर- देवेंद्र फडणवीस

राज्यात कोरोना चाचण्या वाढवण्याची नितांत गरज असल्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केली आहे.

कमी कोरोना चाचण्यांमुळे महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर- देवेंद्र फडणवीस
SHARES

महाराष्ट्रात कमी कोरोना चाचण्या होत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी २१ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील असून एकूण मृत्यूपैकी ३८ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे कोरोना चाचण्या वाढवण्याची नितांत गरज असल्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केली आहे. (need to increase covid 19 test in maharashtra and mumbai demands opposition leader devendra fadnavis)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे की, कोरोना चाचण्या सातत्याने नियंत्रित केल्या जात असल्याने दिवसेंदिवस स्थिती आणखी विदारक होत चालली आहे. देशातील ७ राज्य ७० टक्के रुग्णांची भर घालत आहेत. त्यातील केवळ ३ राज्यात ४३ टक्के रुग्णांची भर घालत आहेत. यात महाराष्ट्राचा वाटा २१ टक्के आहे. ३८ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. 

परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असतानासुद्धा आणि वारंवार आग्रह केला जात असतानासुद्धा चाचण्या अतिशय नियंत्रित पद्धतीने केल्या जात आहेत. हे पुन्हा एकदा खेदाने नमूद करावंसं वाटतं. प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्यांच्या यादीत महाराष्ट्र भारताच्या सरासरीपेक्षा खूप मागे आहे आणि त्याचा परिणाम म्हणून संसर्ग दराच्या बाबतीतसुद्धा भारताच्या सरासरीपेक्षाही महाराष्ट्राची सरासरी अधिक आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा - मृत्यू कोरोनामुळे नाही, तर नैसर्गिकच, प्रकाश आंबेडकरांचा दावा

संपूर्ण आॅगस्ट महिन्याचा विचार केला, तरी महाराष्ट्राचा संसर्ग दर हा १८.४४ टक्के आहे. तर मुंबईचा संसर्ग दर १३.६३ टक्के आहे. असं असतानासुद्धा चाचण्यांवर लक्ष केंद्रीत न करणं हे जीवघेणं ठरू शकतं. हे मला पुन्हा नम्रपणे नमूद करावंसं वाटतं. विशेषत: मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीला लवकर पूर्वपदावर आणायचं असेल, तर अधिक संख्येने चाचण्यांना पर्याय नाही, हे लक्षात घ्यावं लागेल, हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

एकाबाजूला महाराष्ट्रात जुलै महिन्यात प्रतिदिन ३७,५२८ चाचण्या करण्यात येत होत्या, त्या आॅगस्ट महिन्यात ६४,८०१ प्रतिदिन इतक्या झाल्या आहेत. म्हणजे जवळजवळ ४२ टक्क्यांनी आपण राज्यात चाचण्या वाढवल्या. पण मुंबईत जुलै महिन्यात प्रतिदिन ६५७४ चाचण्या झाल्या, तरी संख्या आॅगस्टमध्ये प्रतिदिन ७७०९ चाचण्या इतकी झाली. ही वाढ अवघी १४ टक्के इतकी आहे. परिणामी आज मुंबईत रुग्णसंख्या कमी दिसून येत असली, तरी तो चाचण्या नियंत्रित करण्याचा परिणाम आहे. नाही अधिक तर किमान ज्या प्रमाणात राज्यातील चाचण्या वाढल्या त्याच प्रमाणात मुंबईतील चाचण्या वाढवण्याची नितांत गरज आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा