शिवसेना उभी करण्यात आदित्य ठाकरेंचं योगदान काय? - रामदास कदम

शिवसेना उभी करण्यात आदित्य ठाकरेंचं काय योगदान आहे? अशी विचारणा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. तुम्ही आजारी होतात, पण आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते ना? अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले असून आपल्याला आणि मुलाला संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे.

“तुम्ही आजारी होतात, पण आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते ना? आदित्य ठाकरेंना आपलं सोडून इतरांची खाती सांभाळायची आहेत. त्यांना आमदारांना, खासदारांना भेटायचं नाही. आता तुमच्या यात्रा निघत आहेत, मातोश्री आणि शिवसेनेचे दरवाजे उघडले असून सर्वांना भेटत आहात. हेच जर तीन वर्ष केलं असतं तर ही वेळ आली नसती,” असंही ते म्हणाले.

“मुलाखत पाहिली तर उंदराला मांजर साक्ष अशीच होती. बाळासाहेबांची शिवसेना आई होती, तर मग त्यांच्या विचारांसोबत गद्दारी कोणी केली तेदेखील सांगा. नवीन शिवसैनिक तुमच्या भावनात्मक गोष्टींमध्ये अडकतील, पण जुन्या शिवसैनिकांनी अनुभव घेतला आहे. अनेक शिवसैनिक वारले, देशोधडीला लागले, संसार उद्ध्वस्त झाले त्यानंतर ही शिवसेना उभी राहिली. तुमच्या आदित्यचं योगदान काय? ते आमदार, खासदारांना पाहतदेखील नाहीत. मी प्लास्टिकबंदी केली आणि आपणच केली असं ते सभागृहात सांगत होते,” असा आरोप रामदास कदम यांनी केला.

“उदय सामंत यांनी सांगितलं ते जास्त भयानक आहे. उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना कदम कुटुंबाला संपवून टाकण्यासाठी सहा बैठका झाल्या. या बैठकीला सुभाष देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, आदित्य ठाकरे उपस्थित होते,” असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

“रुग्णालयात असतानाही आमच्याविरोधात कटकारस्थान करुन संपवायला निघाला असाल, तर तुम्ही आम्हाला नाही शिवसेनेला संपवत आहात,” असंही ते म्हणाले.

“मी त्यांना पक्षप्रमुख म्हणणार नाही, माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन. शरद पवारांऐवजी बाळासाहेबांच्या विचारांचा नेतृत्व ठेवलं असतं तर मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हटलं असतं. पण आज ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम करत नाहीत. तर शरद पवारांच्या मांडीवर बसून, त्यांच्या विचारांशी सहमत होऊन काम करत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी, बेईमानी, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे,” असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.


हेही वाचा

उद्धव ठाकरेंची संजय राऊतांना ऑफर, तुम्हीही भाजपात जा म्हणजे...

Uddhav Thackeray Interview: “…आईला गिळायला निघालेली औलाद,” उद्धव ठाकरे संतापले">Uddhav Thackeray Interview: “…आईला गिळायला निघालेली औलाद,” उद्धव ठाकरे संतापले

पुढील बातमी
इतर बातम्या