Advertisement

Uddhav Thackeray Interview: “…आईला गिळायला निघालेली औलाद,” उद्धव ठाकरे संतापले

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांसोबतच, राज्यातील सत्तांतर यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. जाणून घ्या त्यांच्या मुलाखतीतील ६ मुद्दे

Uddhav Thackeray Interview: “…आईला गिळायला निघालेली औलाद,” उद्धव ठाकरे संतापले
SHARES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा सामनातील मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित केला जाणार आहे. शिवसेनेतील बंडानंतर आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही पहिली मुलाखत आहे.

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांसोबतच, राज्यातील सत्तांतर यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आंमदारांवर टीका केली आहे. राजकारणात जन्म दिलेल्या आईला गिळायला निघालेली ही औलाद आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. यांना ताकद दिली ही माझी चूक आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

नेमकं काय चुकलं? असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरेंनी आपलीच चूक असल्याचं सांगितलं. “चूक माझी आहे आणि पहिल्याच फेसबुक लाईव्हमध्ये मी हे कबूल केलं होतं. माझा गुन्हा आहे की, मी यांना कुटुंबातील समजून अंधविश्वास ठेवला,” अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

१) “जी विकली जाऊ शकते ती निष्ठाच नसते”

“त्यांना ताकद दिली ही माझी चूक आहे. त्यात ताकदीने त्यांनी उलटा वार केला. राजकारणात जन्म दिलेल्या आईला गिळायला निघालेली ही औलाद आहे. पण तेवढी ताकद त्यांच्यात नाही, कारण आई ही आईच असते,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. निष्ठा विकली जाऊ शकत नाही, जी विकली जाऊ शकते ती निष्ठाच नसते असंही त्यांनी सुनावलं.

२) “ही राक्षसी महत्वाकांक्षा”

मुख्यमंत्री होणं चुकलं का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं “त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर काय झालं असतं? कारण यांची भूकच भागतच नाही. यांना मुख्यमंत्रीपदही पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे. शिवसेना प्रमुखांसोबत स्वत:ची तुलनाच करु लागला आहात. ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे आणि याला हावरटपणा म्हणतात, त्याला सीमा नसते”.

३) महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का?

यावर उद्धव म्हणाले की “महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला असता तर जनतेने उठाव केला असता, पण तसं झालं नाही. कारण जनता आनंदी होती. सत्तेवर येताच आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. त्यानंतर कोरोना काळात संपूर्ण मंत्रिमंडळाने, प्रशासनाने आणि जनतेने उत्तम कार्य केलं. म्हणूनच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं असलं तरी ते मी माझं नाव मानत नाही. जनतेचा प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होतं. जर यांनी सहकार्य केलं नसतं तर मी एकटा काय करणार होतो”.

४) …म्हणून घराबाहेर पडत नव्हतो

“घराबाहेर पडायचं नाही हेच मी लोकांना सांगत असल्याने मीदेखील घराबाहेर पडत नव्हतो. घराबाहेर न पडतासुद्धा देशातल्या सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव का आलं? कारण मी लोकांना घराबाहेर पडू नका सांगत होतो आणि लोक ऐकत होते. मी जर तेव्हाही आणि आजही घराबाहेर पडलो तरी शिवसेनाप्रमुखांच्या, पूर्वजांच्या आशीर्वादाने गर्दी होतेच. मग काय लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण असं झालं असतं,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी घराबाहेर न पडल्याच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

५) “विश्वासघातक्यांना माझ्याबद्दल काय वाटतं याबद्दल चिंता नाही”

“विश्वासघातक्यांना माझ्याबद्दल काय वाटतं याबद्दल मला चिंता नाही. महाराष्ट्राच्या जनतेला मी त्यांच्या कुटुंबातला वाटतो. हे असं भाग्य फार कमी लोकांच्या नशिबी येतं आणि ते यांच्या नशिबी आलं असेल असं वाटत नाही,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

६) “कपाळावर विश्वासघाताचा शिक्का”

“‘हम तुम एक कमरे मै बंद हो’ असं यांचं मंत्रिमंडळ आहे. त्याचा विस्तार कधी होणार माहिती नाही. पण मंत्री झाले तरी कपाळावर विश्वासघाताचा शिक्का बसलाय तो पुसता येणार नाही,” असंही ते म्हणाले.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा