सरकार शिक्षक भरती केव्हा करणार?

अनेक वर्षांपासून राज्यातील शिक्षक भरतीचा प्रश्न रखडला असून, डीएड, बीएड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारनं हे अधिवेशन संपण्यापूर्वी २४ हजार शिक्षकांच्या भरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

शिक्षक भरतीचा प्रश्न एेरणीवर

नियम २९३ अंतर्गत विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना विखे-पाटलांनी शिक्षक भरतीच्या प्रश्नाला वाचा फोडली. रोजगाराची हमी देणाऱ्या राज्य सरकारनं डीएड, बीएड झालेल्या विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसली. गेल्या कित्येक महिन्यांपासून शिक्षक भरतीचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकार केवळ पोकळ आश्वासनं देऊन पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहे. गेल्या १० फेब्रुवारीला शिक्षणमंत्र्यांनी पुढील सहा महिन्यांत २४ हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा मोठ्या दिमाखात केली. खरं तर या शिक्षक भरतीसाठी पूर्वपरीक्षा केव्हाच झाली आहे. सरकारला फक्त त्याचा निकाल जाहीर करून भरती करायची आहे, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

डीएड, बीएड केलेल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त करावा लागत आहे. अधिवेशन सुरू होताना काही मुलं मला भेटायला आली होती, अशी माहितीही विखे-पाटील यांनी दिली.

तर अांदोलन करू...

शिक्षक भरतीची पूर्वपरीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये साधारणतः ६० टक्के मुली आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ रोजगारापुरता मर्यादित राहिलेला नाही. आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही अनेक पालकांनी उद्या अापला मुलगा शिक्षक झाला तर घराचं भलं होईल, या आशेनं त्यांना शिकवलं. तेदेखील विद्यार्थी अाता नैराश्याने ग्रासू लागले आहेत. सरकारनं शिक्षक भरती न केल्यास आम्हालाही आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.


हेही वाचा -

शिक्षक भरतीसाठी द्यावी लागणार ऑनलाईन परीक्षा

पुढील बातमी
इतर बातम्या