अरे ती एवढ्या रात्री बाहेर का?
बाहेर जाण्याची ही काय वेळ आहे का?
सातच्या आत घरात पाहिजे मुलगी
मुलीच्या जातीला शोभत नाही उशीरा बाहेर भटकणे
एवढ्या रात्री बाहेर फिरत होती, मग असेच होणार तिच्यासोबत!
ब्ला...ब्ला...ब्ला...असे सल्ले देणारे अनेक सल्लागार तुमच्या आसपास नक्कीच असतील. स्त्रियांसाठी तर हे रोजचेच झाले आहे. कधी काही घडले की 'सो कॉल्ड' संस्कृती जागी होते. मग परिस्थिती काही असो, पण नेहमी तिलाच जबाबदार धरले जाते. एखाद्या तरूणीसोबत छेडछाड झालेली असो वा बलात्काराची घटना असो, प्रत्येक वेळी तिलाच दोषी ठरवले जाते. पण त्या पुरुषाच्या मानसिकतेवर कोणीच बोट उचलत नाही. उलट ती मुलगी कशी चुकली हे सिद्ध करण्यासाठी संस्कृतीचे रक्षणकर्ते पुढाकार घेतात. मग ती अपरात्री फिरत होती? त्यात तिचे कपडे? देवा...देवा...अशा परिस्थितीत मुलांचे मन विचलीत तर होणारच ना? असे दाखले देणारे महाशय तर धन्यच.
पण आता बस! हाच विचार करून 'अपनी सडके' या फेसबुक पेजवर आणि ट्वीटरवर महिलांनी एक मोहीम सुरू केली आहे. #meriraatmerisadak आणि #AintNoCinderellaहे दोन हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हरियाणात घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून सोशल मीडियावर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत महिलांना रात्री उशीरा घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फक्त रस्त्यावर उतरायचेच नाही, तर तुमचा फोटो किंवा लाइव्ह व्हिडिओ करून 'अपनी सडके' या फेसबुक पेजवर शेअर करायचा आहे. केवळ मुंबईतच नाही, तर दिल्ली, चंडीगढ, हरियाणा अशा अनेक शहरांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. अनेक महिलांनी #meriraatmerisadak आणि #AintNoCinderellaहे हॅशटॅग वापरून फोटोही शेअर केले आहेत.
हरियाणातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बरालाने हरियाणातील आयएएस अधिकारी वीरेंदर कुंटू यांची मुलगी वर्णिकाच्या गाडीचा पाठलाग केला. गेल्या आठवड्यात रात्री उशीरा ही घटना घडली. एवढेच नाही तर विकासने तिची छेड देखील काढली होती. वर्णिकाने सर्व प्रकार फेसबुकवर शेअर केला.
या प्रकरणात नेहमीप्रमाणे वर्णिकालाचा दोषी ठरवण्यात आले. पण कुणी त्या मुलावर बोट उचलेले नाही किंवा तो एवढ्या रात्री बाहेर का फिरत होता? असे देखील विचारले नाही. हे कमी होते म्हणून की काय हरियाणा भाजपाचे उपाध्यक्ष रामवीर भट्टी यांनी वादग्रस्त विधान केले. "वर्णिकाने रात्री १२ नंतर बाहेर फिरायला नको होते. ती इतक्या उशीरा का फिरत होती? सध्याचे वातावरण चांगले नाही. त्या तरूणीला रात्री गाडी चालवायला नको हवी होती," असे वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावर ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेला तरूणींचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
रामवीर भट्टी यांचे संतापजनक वक्तव्य चांगलेच गाजले. या विरोधातच तरूणींनी सुरू केलेल्या मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी रात्रीचे फोटो आणि व्हिडिओ ट्वीटर आणि फेसबुकवर शेअर करून मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच असे संकुचित विचार असलेल्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी या शनिवारी म्हणजेच १२ तारखेला रात्री अनेक शहरांमधल्या महिलांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा