'या' मशिदीत महिलाही करतात कुराणाचे पठण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

धार्मिक स्थळी मुक्त प्रवेश मिळविण्यासाठी एका बाजूला कर्मठ विचारसरणीच्या संस्था, संघटनांविरोधात महिलांचा लढा सुरू असताना मुंबईतील एका मशिदीने महिलांच्या या लढ्याला बळ देणारे मोठे पाऊल उचलले आहे. यारी रोडमधील या मशिदीने शिया महिलांना उलेमाची भूमिका पार पाडण्याची परवानगी दिली आहे. अशी परवानगी देणारी ही शहरातील पहिलीच मशिद ठरली आहे. शहरातील इतर मशिदीत शुक्रवारी मौलवींकडूनच कुराणाचे पठण होत असताना, या मशिदीत मात्र महिला उलेमाही कुराणाचे पठण करतात.

केरळमधील शबरीमाला मंदिर, नाशिकमधील शनिमंदिर किंवा महालक्ष्मी येथील हाजी अली दर्गा असो, महिला संघटनांनी पुरूषांच्या प्रभुत्वाला टक्कर देत आपला हक्क मिळवण्याचा जोरदार प्रयत्न केला. यांतील बहुतांश प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. अशा परिस्थितीत यारी रोड मशिदीतील मौलाना मोहम्मद फयाज बाकरी यांच्या पत्नी उज्मा यांनी पुढाकार घेत महिलांना कुराणाचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. कुराणाचा अभ्यास करून या महिला इतर महिलांनाही इस्लामचे शिक्षण देत आहेत.

मी मशिदीत कुराण देखील शिकवते. साधारणत: ५ ते १५ वयोगटातील मुलींना मी प्रामुख्याने कुराणाचे शिक्षण देते. नमाज कसा पढला पाहिजे, इस्लामच्या नियमानुसार कसे वागले पाहिजे, असे विषय मी येथे शिकवते.

- उज्मा फयाज 

या संदर्भात मौलाना मोहम्मद फयाज म्हणाले की, जेव्हा तुम्ही एका महिलेला शिक्षण देता, तेव्हा तुम्ही एक कुटुंब शिक्षित करत असता. याचनुसार जेव्हा तुम्ही एका कुटुंबाला शिक्षण देता, तेव्हा तुम्ही समाजालाही शिक्षित करत असतात. येथील महिला अनेक विषय शिकवतात. त्यात कुराण कसे वाचावे, लहानग्यांचे पालनपोषण कसे करावे, मुलींना शिक्षण का द्यावे, चांगले व्यक्ती कसे बनावे, या विषयांचा समावेश आहे. महिलांना मार्गदर्शन करणाऱ्या या उलेमा प्रामुख्याने इस्लामी 'दीन' (धर्माचे ज्ञान) आणि 'दुर्य' (विश्व) यांमध्ये समन्वय साधण्यावर भर देतात.

तीन तलाक प्रकरणात लढा देणाऱ्या 'द इस्लामिक स्टडिज फाॅर डायलॉग'च्या संचालक डॉ. जीनत शौकत अली यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.


हे देखील वाचा -

याला म्हणतात छोटा पॅकेट, बडा धमाका!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या