ऑस्ट्रेलियातल्या 'या' जाहिरातीवरुन रंगतोय वाद!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

सोशल मीडियावर हल्ली कोणत्याही गोष्टीला लगेच प्रसिद्धी मिळते, आणि तितक्याच वेगाने एखादी गोष्ट टिकेच्या केंद्रस्थानीही येते. ऑस्ट्रेलियात एका कंपनीने प्रसिद्ध केलेली जाहिरात सध्या अशीच चर्चेत आणि वादात सापडली आहे. ही जाहिरात एका मटण बनवणाऱ्या कंपनीची आहे. आणि ती वादात सापडण्याचं कारणही तसंच आहे. यात विविध धर्मातील देव-देवता, धर्मगुरुंची पात्र आहेत. आणि ते चक्क या प्रॉडक्टचं समर्थन करताना दिसत आहेत.

'मीट अॅण्ड लिव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया' या कंपनीची ही जाहिरात मंगळवारी प्रसिद्ध झाली होती. पण देवदेवतांना अशा प्रकारे दाखवल्याबद्दल संताप व्यक्त करत ती बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावरही याविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

या जाहिरातीत टेबलाभोवती गणपतीसोबतच जीजस, गौतम बुद्ध आणि इतर धर्मांचे देव दाखवण्यात आले आहेत. ‘द मीट मोर पीपल कॅन इट’ अशी या जाहिरातीची टॅगलाईन आहे. याचा अर्थ हे मांस जास्तीत जास्त लोक खावू शकतात असा आहे. 'इंडियन सोसायटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया'चे प्रवक्ते नितिन वशिष्ठ यांनीही या जाहिरातीचा विरोध केला आहे.

या जाहिरातीचा विरोध होत असताना 'मीट अॅन्ड लिव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया'चे मार्केटिंग मॅनेजर अॅंड्यू होवी म्हणाले, 'आमची जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही कोणत्याही धर्माला मानणारे असाल, पण मटणासाठी सर्वजण एकत्र येतात, हे आम्हाला दाखवायचे आहे'.

आपले सगळे देव शाकाहारी आहेत. अशा प्रकारे त्यांना मांस खाताना दाखवणे हे आपल्या धर्माचा अपमान करणे आहे. असे सगळे उपद्व्याप परदेशी कंपन्या नेहमीच करतात. त्यामुळे अशी परदेशी उत्पादने घेण्यापूर्वी सगळ्यांनीच विचार करायला हवा.

कल्पेश दांडेकर, मुंबईकर


हेही वाचा -

अन् थायलंडच्या भाविकांनीही केलं बाप्पाचं विसर्जन

पुढील बातमी
इतर बातम्या