सबज्युनियर बॅडमिंटनमध्ये अालिशा नाईकला दुहेरी मुकुट

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

मुंबई उपनगरच्या अालिशा नाईक हिने मुलींच्या १३ वर्षांखालील गटात एकेरी अाणि दुहेरीचे जेतेपद पटकावून महाराष्ट्र सबज्युनियर राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केला. मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्पोर्टस काॅम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत अालिशाने एकेरीच्या अंतिम फेरीत ठाण्याच्या तानिका सिक्वेरा हिचा २१-१६, २१-१७ असा पाडाव केला. त्यानंतर मधुमिता नारायण हिच्या साथीने खेळताना अालिशाने सिया सिंग अाणि तारिणी सिरी यांना २१-१६, २१-१४ अशी पराभवाची धूळ चारली.

मुलांमध्ये प्रज्ज्वलला दुहेरी जेतेपद

मुलांच्या १३ वर्षांखालील गटात अव्वल मानांकित प्रज्ज्वल सोनावणे याने ठाण्याच्या दुसऱ्या मानांकित अोम गवंडी याला २१-१८, २१-१४ असे सरळ गेम्समध्ये पराभूत केले. त्यानंतर अोमच्या साथीनेच दुहेरीत खेळताना अाद्य पारसनिस अाणि श्रेयस साने यांच्यावर २१-१९, २१-८ अशी मात करत दुहेरी जेतेपद संपादन केले.

यांनीही पटकावले जेतेपद

पुण्याच्या बॅडमिंटनपटूंनी या स्पर्धेत छाप पाडली. तारा शाह (१५ वर्षांखालील मुली एकेरी गट), दर्शन पुजारी (१५ वर्षांखालील मुले एकेरी गट), रुचा सावंत अाणि रिया हब्बू (१५ वर्षांखालील मुली दुहेरी) तसेच अार्य अाणि ध्रूव टाकोरे (१५ वर्षांखालील मुले दुहेरी) यांनीही अापापल्या गटात विजेतेपद पटकावले.


हेही वाचा -

क्रिकेटपटूंची कारकीर्द बरबाद करू नका, संदीप पाटील भडकले

राहुल द्रविडचा 'हाॅल अाॅफ फेम’मध्ये समावेश


पुढील बातमी
इतर बातम्या