राष्ट्रीय जलतरण वाॅटरपोलोमध्ये महाराष्ट्राच्या मुलांना रौप्यपदक

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

महाराष्ट्राच्या मुलांनी विजेतेपदासाठी निकराची झुंज दिली तरी त्यांना पश्चिम बंगालकडून ४-५ असा निसटता पराभव स्वीकारावा लागल्यामुळे राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वाॅटरपोलो या प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. पुण्यातील बालेवाडी इथे सुरू असलेल्या सबज्युनियर अाणि ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने अखेरच्या तीन सत्रात गोल करण्याच्या संधी गमावल्या, त्यामुळे महाराष्ट्राचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. वाॅटरपोलो प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने कांस्यपदक पटकावले.

वेदिका अमिनचा विक्रम

महाराष्ट्राच्या वेदिका अमिनने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात, २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात नव्या विक्रमाची नोंद केली. यापूर्वी महाराष्ट्राच्याच केनिशा गुप्ता हिने रचलेला (२ मिनिटे ५१.९४ सेकंद) विक्रम तिने मोडीत काढला. वेदिका अमिनने २ मिनिटे ४३.९७ सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक पटकावले.

अन्या, नील राॅयला रौप्य

१४ वर्षांखालील मुलींच्या गटात, १५०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात अन्या वाला हिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. तिनं १८ मिनिटे ३८.४२ सेकंद अशी वेळ दिली. या गटात दिल्लीच्या भाव्या सचदेवनं सुवर्णपदक प्राप्त केलं. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात, २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात नील राॅयनं पूर्वीच्या विक्रमापेक्षा चांगली कामगिरी केली. मात्र त्यालाही रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं.


हेही वाचा -

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या अार्यन वेर्णेकरचा राष्ट्रीय विक्रम

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नील राॅयचा नवा विक्रम

पुढील बातमी
इतर बातम्या