सचिन तेंडुलकर राज्यपालांच्या भेटीला

भारत जगातील सर्वात तरुण देश म्हणून उदयाला येत असून २०२० पर्यंत ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या आतील असेल. मात्र दुसरीकडे भारत मधुमेहाची राजधानी होत आहे, तसंच लठ्ठपणामध्ये देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपली तरुणाई तंदुरुस्त आणि स्वस्थ रहावी यासाठी क्रीडा हा विषय शिक्षणात समाविष्ट करावा, अशी विनंती माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे केली. 

शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयापर्यंत सर्वांनी दिवसातून किमान एक तास खेळासाठी द्यावा, तसंच सर्व विद्यापीठांमध्ये ‘तरुण आणि स्वस्थ भारत’ मोहीम राबवावी, या मागणीसाठी गुरुवारी सचिन तेंडुलकर राजभवनात राज्यपालांच्या भेटीला गेला होता.

राज्यपालांनी केलं सचिनचं अभिनंदन

विद्यापीठांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल यावेळी राज्यपालांनी सचिन तेंडुलकरचं अभिनंदन केलं. तसंच मोहिमेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासनही दिलं. ‘तरुण आणि स्वस्थ भारत’ अभियानासाठी कॉर्पोरेट जगताचा सामाजिक दायित्व निधी देखील मिळू शकेल असंही राज्यपालांनी सांगितलं. आदिवासी बहुल क्षेत्रामधील खेळाडूंना मदत करण्याच्या सचिन तेंडूलकर याच्या भूमिकेचे देखील राज्यपालांनी स्वागत केलं.

राज्यपालांशी केली चर्चा

मे महिन्यात सचिन तेंडूलकरने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट देऊन ‘तरुण आणि स्वस्थ भारत’ अभियान राबवण्याबद्दल पुढाकार घेतला होता. हे अभियान राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये राबवावे या दृष्टीने तेंडुलकरने राज्यपालांशी चर्चा केली.

भारत हा क्रीडाप्रेमी देश असून आता प्रत्यक्ष खेळणारा देश झाला पाहिजे. लहान मुलांमधील क्रीडा नैपुण्य हेरणारे उत्तम प्रशिक्षक देशाला हवे आहेत. देशात अनेक निवृत्त खेळाडू आहेत. त्यांच्या सेवा प्रशिक्षक म्हणून वापरल्या जाव्यात, असंही मत तेंडुलकरने यावेळी व्यक्त केलं.


हेही वाचा -

८० टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना १००० रूपये प्रतिमाह अर्थसहाय्य - राजकुमार बडोले

पुढील बातमी
इतर बातम्या