ज्येष्ठ रंगकर्मी, 'अविष्कार' नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ आणि समांतर रंगभूमीवर 'रंगायन' संस्थेचे संस्थापक अरुण काकडे उर्फ काकडे काका यांचे आज (बुधवारी) निधन झाले. मुंबईतल्या निवासस्थानी दुपारी २.३० वाजता त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पन्नासहून अधिक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या अरुण काकडे यांच्या निधनानं समांतर रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.
'आविष्कार' नाट्यसंस्थेचा मजबूत पाया म्हणून अरुण काकडे यांना ओळखलं जायचं. गेली ६७ वर्षे त्यांनी प्रायोगिक रंगभूमीशी असलेलं आपलं नातं टिकवून ठेवलं. उतारवयातही त्यांनी अनेक नाटकं सादर केली. तरुणांना लाजवेल असाच त्यांचा उत्साह असायचा. रंगभूमीवरील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील देण्यात आले होते. काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
वयाची पंच्याहत्तरी थाटात साजरी करताना काकडे काकांनी १२ महिन्यांत १२ नवीन नाटकं 'आविष्कार' तर्फे रंगमंचावर आणली होती. रंगकर्मीच्या तीन पिढ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. काकडे काका स्वतः पडद्यामागे राहून प्रतिभावान नाट्यकर्मींना प्रोत्साहन द्यायचे.
हेही वाचा