पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! 'ही' ३ स्थानकं होणार अपग्रेड!

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

पश्चिम रेल्वेवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता अंधेरी, जोगेश्वरी आणि कांदिवली या तीन गजबजलेल्या स्थानकांवर विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्थानकांचं अपग्रेडेशन करण्यात येणार आहे. लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे.

अंधेरी स्थानकावर काय होणार?

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानक हे सर्वात जास्त गर्दीचं स्थानक म्हणून ओळखलं जातं. या स्थानकावर यापूर्वीच विस्ताराच्या अनुषंगाने सुविधा देण्यात आल्या आहेत. पण, वाढती गर्दी लक्षात घेऊन आणखी २ पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही पुलांसाठी मागवण्यात आलेल्या निविदा २६ एप्रिलला उघडण्यात येणार आहेत. या पुलांचे काम आठ महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अंधेरीतील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ आणि ९ची रुंदी कमी आहे. पण, तिथे रुंदीकरण शक्य नसल्याने तिथे आणखी एक सहा मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधला जाणार आहे.

जोगेश्वरी स्थानक कसं होणार अपग्रेड?

जोगेश्वरी स्थानकात सध्या दोन पादचारी पूल आहेत. ज्यावर डेक आणि तिकीट आरक्षण कार्यालय आहे. त्यासह पश्चिमेकडील चारही प्लॅटफॉर्मला जोडणारा सहा मीटर रुंदीचा आणखी एक पादचारी पूल लवकरच बांधण्यात येणार आहे. जोगेश्वरीतील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ ची रुंदी कमी असल्याने त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. १५ डब्यांच्या लोकलना थांबा देण्याच्या उद्देशाने प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ ची रुंदी वाढवली जाणार आहे. या स्थानकावर लवकरच चार सरकते जिने बसवले जाणार आहेत. या सरकत्या जिन्यांमुळे रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.

कांदिवली स्थानकावर नवीन पूल

कांदिवली स्थानकात नवीन पादचारी पूल बांधला जाणार असून त्याचे काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, एका पादचारी पूल जुना झाल्याने तो पुन्हा बांधला जाणार असल्याने हा पूल तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अन्य पुलांवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन तिथे रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) जवान तैनात करण्यात येणार आहेत.


हेही वाचा

अंधेरी ते विरारपर्यंत १५ डब्यांची स्लो लोकल

'या' १९ रेल्वे स्टेशनचा होणार विस्तार!

पुढील बातमी
इतर बातम्या